कोण म्हणतं अवैध धंद्यांवर कारवाई नाही? एसपी निलेश तांबेच्या नेतृत्वात बुलडाणा पोलिसांचा डोळ्यात तेल घालून पहारा! अवैध धंद्यांवर मोठा तडाखा!
आठवडाभरात १०५ गुन्हे दाखल; १५३ आरोपींवर कारवाई, तब्बल २ कोटी १५ लाखांचा मुद्देमाल जप्त
जिल्ह्यातील अवैध धंदे करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी दिल्या आहेत. त्यानुसार बुलढाणा पोलिसांकडून विविध पथकांच्या माध्यमातून कारवाया सुरू आहेत.
जिल्ह्यात अवैध देशी-विदेशी दारू तसेच गावठी हातभट्टी दारूच्या विक्रीविरोधात कारवाई करण्यात आली. या कारवाईत ७६ केसेस दाखल करून ७६ आरोपींना पकडण्यात आले. आरोपींकडून ३ लाख ९२ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
जुगारविरोधी कारवाईत २१ केसेस दाखल करण्यात आल्या असून ६३ आरोपींना पकडण्यात आले. या कारवाईत २ लाख ९९ हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आर्म्स ॲक्ट अंतर्गत जिल्ह्यात दोन प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली. यात चार आरोपींकडून एक पिस्तूल, एक मॅग्झीन, एक चाकू, एक कोयता, दोन मोटारसायकली आणि एक मोबाईल असा शस्त्रसाठा व साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईत १ लाख ८६ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
NDPS Act अंतर्गत गांजा बाळगणाऱ्या इसमांविरुद्धही पोलिसांनी कारवाई केली. दोन प्रकरणांत दोन आरोपींवर कारवाई करत १.१७० किलो गांजा जप्त करण्यात आला. जप्त गांजाची किंमत ५८ हजार ५०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
रेती चोरीत २ कोटींचा मुद्देमाल जप्त
अवैध गौण खनिज अर्थात रेती चोरीविरोधातील कारवाईत पोलिसांनी मोठी कारवाई केली. चार प्रकरणांत आठ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या ताब्यातून वाहनांसह तब्बल २ कोटी ६ लाख ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आठवडाभरातील कारवाईत २.१५ कोटींचा मुद्देमाल जप्त
पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या नेतृत्वाखाली मागील आठवड्यापासून अवैध धंद्यांविरोधात राबविण्यात आलेल्या मोहिमेत विविध ठिकाणी १०५ गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणांत १५३ आरोपींवर कारवाई करण्यात आली असून एकूण २ कोटी १५ लाख ६७ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून, अवैध धंद्यांविरोधातील कारवाई यापुढेही सुरूच राहणार असल्याचे बुलढाणा पोलिसांनी स्पष्ट केले आहे.