बुलडाण्याचे पोलीस अधीक्षक कोण? आज ‘कॅट’मध्ये निर्णायक सुनावणी
Jun 9, 2025, 08:33 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):बुलडाणा जिल्ह्यात पोलीस अधीक्षक पदावरून निर्माण झालेला गोंधळ राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. प्रशासनिक पातळीवर ‘संगीत खुर्ची’सदृश सुरू असलेला अधिकार संघर्ष आज केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण (कॅट) यांच्यासमोर अंतिम टप्प्यात पोहोचणार आहे. पोलीस अधीक्षक विश्व पानसरे आणि निलेश तांबे यांच्यातील पदाधिकाऱ्याच्या ‘हक्का’साठीची ही रस्सीखेच आता निर्णायक वळणावर आली आहे.
२२ मे २०२५ रोजी गृह विभागाने विश्व पानसरे यांची बदली अमरावती येथे करत त्यांच्या जागी निलेश तांबे यांची नेमणूक बुलडाणा जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी केली होती. मात्र पानसरे यांनी ही बदली अचानक व कारणांशिवाय झाल्याचा दावा करत ‘कॅट’मध्ये न्याय मागितला. कॅटने त्यांच्या याचिकेवर सुनावणी करत सरकारच्या बदली आदेशावर तात्पुरती स्थगिती दिली आणि पुढील सुनावणीसाठी ९ जून ही तारीख निश्चित केली.
या निर्णयानंतर घटनांना वेग आला. ‘सिक लिव्ह’वर असलेले पानसरे पुन्हा एकदा पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झाले आणि त्यांनी पुन्हा पदाचा ताबा घेतला. त्यांचा हा अनपेक्षित प्रवेश पोलीस दलासाठी धक्कादायक ठरला. दुसरीकडे, निलेश तांबे यांनी संयम ठेवत कार्यालयीन कामकाज अप्पर पोलीस अधीक्षकांच्या कक्षातून सुरू ठेवले. ही परिस्थिती गोंधळाची झाली असून, एकाच पदासाठी दोन अधिकारी कार्यरत असल्याचा अभूतपूर्व प्रकार राज्यात पहिल्यांदाच घडला आहे.
या संपूर्ण प्रकरणावर अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. पोकळे यांनी हस्तक्षेप करत दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये तात्पुरता समन्वय साधला आणि ९ जूनपर्यंतची स्थिती जशीच्या तशी राखण्याचे निर्देश दिले.
या घटनांच्या पार्श्वभूमीवर आज होणारी ‘कॅट’मधील सुनावणी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. यामध्ये सरकारने घेतलेल्या निर्णयाचे समर्थन कितपत ठोस ठरेल, यावरच या ‘खुर्ची संग्रामा’चा शेवट ठरणार आहे. काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या वादामुळे विभागाची प्रतिमा मलीन झाल्याचे मत व्यक्त केले आहे.
ही सुनावणी पानसरे यांच्या बाजूने लागते की, शासनाच्या आदेशाला दुजोरा मिळतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या निर्णयामुळे केवळ बुलडाणा जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदाचे नव्हे, तर प्रशासनाच्या निर्णयक्षमतेचेही मूल्यमापन होणार आहे.
आजच्या निकालावर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. ‘कॅट’चा निर्णय या अधिकार संघर्षावर पूर्णविराम ठरेल की नव्या वादाला तोंड उघडेल, हे काही तासांत स्पष्ट होईल. तोपर्यंत जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखपदावर कोणाची ‘खुर्ची’ टिकते, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.