दिवठाणा गावात नेमकं काय घडलं? चिमुकल्यांना गुडघाभर चिखलातून जावं लागतंय शाळेत; संतप्त ग्रामस्थांनी पारावरच भरवली शाळा!
भर चिखलातून चालत शाळेत पोहोचलेल्या विद्यार्थ्यांना पाय धुवायला साधी व्यवस्थाही नाही. त्यामुळे लेकरांना दिवसभर चिखलाने माखलेल्या पायांनीच वर्गात बसावं लागत आहे. यामुळे त्यांच्या आरोग्याचाही प्रश्न ऐरणीवर आला असून, शिक्षणासोबतच स्वच्छतेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या रस्त्याबाबत संबंधित विभागाकडे अनेकदा पाठपुरावा करण्यात आला.
अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्याकडे वारंवार मागणी करूनही अद्याप रस्त्याचं काम सुरू झालेलं नाही. प्रशासनाकडून केवळ आश्वासनंच मिळाली, प्रत्यक्षात मात्र परिस्थिती जैसे थेच असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी गावच्या पारावरच विद्यार्थ्यांची शाळा भरवून अनोखं आंदोलन केलं. "आता तरी प्रशासन जागं व्हावं," अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. लवकरात लवकर रस्त्याचं काम हाती न घेतल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, प्रसंगी शाळेलाच कुलूप ठोकण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.