SPECIAL NEWS काय म्हणता? मेहकरच्या कोराडी धरणातून मिळणार "सी–प्लेन"ची सेवा! उडान ५.५ योजने अंतर्गत विचार सुरू...! महाराष्ट्र विमानतळ विकास महामंडळाने दिला प्रस्ताव 

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): तुम्ही जे शीर्षक वाचले ते शक्य होऊ शकते. 
समृद्धी महामार्गामुळे "मुंबई टच" झालेला मेहकर परिसर आता सी प्लेन सेवेसाठी देखील काही दिवसांनी ओळखला गेला तर नवल वाटायला नको. मेहकर जवळच्या कोराडी धरण परिसरात ही सेवा सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्र विमान विकास महामंडळाने अर्थात एम ए डी सी यांनी राज्यात आठ ठिकाणी सी प्लेन सेवा सुरू करण्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे तसा प्रस्तावच दिला आहे. 
पर्यटन दृष्ट्या बुलढाणा जिल्हा हा तसा महत्त्वाचा पण देशांतर्गत वाहतूक सुविधेबबत माघारलेला आहे. केंद्र सरकार देशातील पर्यटनाला चालना मिळावी आणि दुर्गम भागांसोबत हवाई संपर्क जोडण्याच्या उद्देशाने देशभरामध्ये दीडशे मार्गांवर "सी प्लेन सेवा" सुरू करण्याचा विचार करत आहे. उडान ५.५ योजने अंतर्गत सी प्लेन आणि हेलिकॉप्टर सेवांचा समावेश करण्यात येणार आहे.
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून सी प्लॅनच्या सेवेसाठी प्राथमिक स्वरूपात केरळ, आंध्र प्रदेश , अंदमान व निकोबार महाराष्ट्र आणि लक्षद्वीप या राज्यांच्या केंद्रशासित प्रदेशांची निवड देखील करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने जलाशय, नद्या किंवा बॅकवॉटर येथून हवाई वाहतूक करण्याचा मानस आहे. महत्वाचे म्हणजे कॅनडामधील एका कंपनीची विमान यात वापरण्यात येणार आहेत. इंडिगो आणि पवनहंस या कंपन्या देखील देशात सी प्लॅन सेवा सुरू करण्याच्या बाबत इच्छुक असल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे. सर्व प्रस्ताव योग्य स्वरूपात मार्गी लागले तर नव्या वर्षाप्रारंभी ही सेवा सुरू होऊ शकते. अर्थात हे सगळं सुस्वरूपात पार पडण्यासाठी राजकीय मानसिकता देखील तेवढीच तगडी लागणार आहे. 
महाराष्ट्रातील ही आहेत प्रस्तावित ८ ठिकाण...
गंगापूर धरण (नाशिक) ,खिंडसी धरण ( नागपूर), कोरडी धरण (मेहकर, बुलढाणा) पवना धरण (पवनानगर, पुणे) पेंच धरण (पारशिवनी, नागपूर) गणपतीपुळे (रत्नागिरी), धोम धरण (वाई जिल्हा सातारा), आणि रत्नागिरी ( रत्नागिरी )...