“आम्ही पोलिस आहोत, परिसरात गांजा पकडलाय!” म्हणत शेतकऱ्याला अडवले; सोन्याची अंगठी घेतली अन् कागदाच्या पुडीत दिले रेतीचे खडे! संग्रामपूर तालुक्यात दोन भामट्यांची हातचलाखी...

 
 संग्रामपूर (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : पोलिस असल्याचा आव आणला... परिसरात गांजा पकडला असून चोरीच्या घटनेची चौकशी सुरू असल्याचे सांगितले... अन् चौकशीच्या बहाण्याने एका ६३ वर्षीय शेतकऱ्याच्या हातातील सोन्याची अंगठीच लंपास केली! विशेष म्हणजे, अंगठी कागदात गुंडाळून परत दिल्याचा बनाव करणाऱ्या दोन भामट्यांनी त्या पुडीत चक्क रेतीचे खडे ठेवले. पुडी उघडल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेतकऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली. हा प्रकार संग्रामपूर तालुक्यातील धामणगाव गोतमारे फाट्याजवळ १८ नोव्हेंबर रोजी दुपारी घडला. गजानन नारायण पाचपोर (६३, रा. पळशी झाशी) असे फसवणूक झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून, याप्रकरणी तामगाव पोलिस ठाण्यात दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गजानन पाचपोर हे १८ नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास दुचाकीने पेट्रोल भरण्यासाठी संग्रामपूर येथून पेट्रोल पंपाकडे जात होते. धामणगाव गोतमारे फाट्याजवळ पोहोचताच दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना अडवले. “आम्ही तुम्हाला किती वेळापासून आवाज देत आहोत, तुम्ही थांबत का नाही?” असा सवाल करीत त्यांनी पाचपोर यांना दमात घेतले. परिसरात गांजा पकडला असून चोरीची घटनाही घडली आहे. त्याची चौकशी आमच्याकडे आहे, आम्ही साहेब आहोत, असे सांगत दोघांनी पोलिस असल्याचा बनाव केला. त्यानंतर चौकशीच्या बहाण्याने पाचपोर यांच्या हातातील पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी पाहण्यासाठी मागितली.

अंगठी हातात घेतल्यानंतर ती कागदात गुंडाळल्याचा बनाव करून एक पुडी त्यांच्या हातात दिली आणि दोघेही दुचाकीवरून संग्रामपूरच्या दिशेने निघून गेले. काही वेळाने पाचपोर यांनी कागदाची पुडी उघडून पाहिली असता त्यात सोन्याच्या अंगठीऐवजी रेतीचे दोन-तीन खडे आढळले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ दुचाकीवरून भामट्यांचा पाठलाग सुरू केला. संग्रामपूर येथील लेंडी नाल्यापर्यंत दोघे दिसलेही; मात्र दुचाकीचा वेग वाढवून त्यांनी पळ काढला. पाचपोर यांनी शेगावपर्यंत त्यांचा शोध घेतला; मात्र दोघेही हाती लागले नाहीत. अखेर त्यांनी तामगाव पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. या तक्रारीवरून दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.