इन्स्टाग्रामवरील प्रेमासाठी बांगलादेशातून थेट जळगाव गाठले; तरुणीसह युवकावर गुन्हा
Updated: May 11, 2026, 18:10 IST
जळगाव : (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : सोशल मीडियावरील ओळख प्रेमात बदलून सीमा ओलांडण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. अशाच एका धक्कादायक प्रकरणाचा उलगडा जळगाव शहरात झाला असून, इन्स्टाग्रामवर झालेल्या मैत्रीनंतर प्रेमात पडलेली 20 वर्षीय बांगलादेशी तरुणी बेकायदेशीररीत्या भारतात दाखल झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शनिपेठ पोलिसांनी संबंधित तरुणीला ताब्यात घेतले असून, तिला आश्रय देणाऱ्या युवकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून जळगावातील एका युवकाची आणि बांगलादेशातील तरुणीची ओळख झाली होती. सोशल मीडियावरील संवाद वाढत गेला आणि दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर संबंधित तरुणीने भारतात येण्याचा निर्णय घेतला. आवश्यक कायदेशीर कागदपत्रे अथवा परवानगी न घेता ती बेकायदेशीर मार्गाने भारतात दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, ही तरुणी जळगाव शहरात राहत असल्याची गोपनीय माहिती शनिपेठ पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधित ठिकाणी छापा टाकला आणि तरुणीला ताब्यात घेतले. चौकशीत ती बांगलादेशातील असल्याचे स्पष्ट झाले. तिच्याकडे वैध पासपोर्ट, व्हिसा किंवा भारतात राहण्यास आवश्यक कागदपत्रे नसल्याचेही पोलिस तपासात उघड झाले.
या प्रकरणी पोलिसांनी विदेशी नागरिक कायदा आणि पासपोर्ट कायद्यानुसार गुन्हा नोंदवला असून, तरुणीला आश्रय देणाऱ्या युवकाविरुद्धही कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास शनिपेठ पोलीस करत आहेत.
या घटनेमुळे सोशल मीडियावरील वाढत्या संबंधांमधून निर्माण होणाऱ्या सुरक्षेच्या प्रश्नांबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.