यासाठी केला होता अट्टाहास? स्व. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा माणूस जिल्हा बँकेत पोहोचावा म्हणून आ. मनोज कायंदेंची धडपड; सुनेत्रा पवारांचा व्हिडिओ संदेशही आला...
पण ‘घड्याळा’चा खराखुरा माणूस निवडून आलाच नाही! ज्या दोन जागा जिंकल्या, त्यातील एक भाजपचा तर दुसरा काँग्रेसचा!
या निवडणुकीत सहकार पॅनलने ९ पैकी ७ जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला, तर स्व. अजित पवार शेतकरी परिवर्तन पॅनलला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे २१ संचालकांपैकी १९ जागा सहकार पॅनलकडे, तर केवळ २ जागा परिवर्तन पॅनलकडे गेल्या.
‘घड्याळ’चा माणूस कुठे गेला?
स्व. अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा बँकेत प्रतिनिधी असावा, या उद्देशाने आमदार मनोज कायंदे यांनी परिवर्तन पॅनल उभे करत प्रस्थापित सहकार नेतृत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. स्व. अजितदादांनी जिल्हा बँकेला पुनर्जीवन दिल्याचा मुद्दाही प्रचारात पुढे करण्यात आला.
एवढेच नव्हे तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून परिवर्तन पॅनलला पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते .त्यामुळे या लढतीकडे केवळ जिल्हा बँकेची निवडणूक म्हणून नव्हे, तर आमदार मनोज कायदेंच्या सहकारातील अस्तित्वाच्या दृष्टीनेही पाहिले जात होते.
मात्र निकाल लागला आणि चित्रच उलटे झाले.ज्या पॅनलच्या माध्यमातून ‘घड्याळा’चा माणूस जिल्हा बँकेत पोहोचवण्याचा प्रयत्न झाला, त्याच पॅनलमधील राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रमुख चेहरा मनोज दांडगे यांचा पराभव झाला.
दोन जागा मिळाल्या; पण राजकीय गणित आणखी वेगळे!
परिवर्तन पॅनलला मिळालेल्या दोन जागा नक्कीच या पॅनलसाठी दिलासा देणाऱ्या आहेत. मात्र या दोन विजेत्यांचे राजकीय संदर्भ पाहिले तर आणखी एक वेगळेच चित्र समोर येते. शिवचंद्र तायडे हे भाजपशी संबंधित, तर ज्ञानेश्वर पाटील हे काँग्रेसचे प्रतिनिधित्व करणारे आहेत.
म्हणजेच ‘अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा माणूस जिल्हा बँकेत पोहोचवायचा’ या उद्देशाने उभ्या केलेल्या पॅनलला दोन जागा मिळाल्या खऱ्या; पण त्या दोन जागांवर निवडून आलेले प्रतिनिधी भाजप आणि काँग्रेसशी संबंधित आहेत.यामुळेच या निकालानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
कायंदेंच्या प्रयत्नांना धक्का?
आमदार मनोज कायंदे यांच्यासाठी हा निकाल विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. कारण त्यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रस्थापित नेतृत्वासमोर पर्यायी राजकीय शक्ती उभी करण्याचा प्रयत्न केला. मात्र ९ पैकी केवळ २ जागा मिळाल्याने त्यांच्या पॅनलला अपेक्षित राजकीय यश मिळाले नाही. त्यातही राष्ट्रवादी काँग्रेसचा अधिकृत राजकीय चेहरा असलेला उमेदवार विजयी न झाल्याने ‘घड्याळ’च्या सहकारातील राजकीय विस्ताराला या निकालातून कितपत बळ मिळाले, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
सहकारचा १९ जागांवर कब्जा!
दुसरीकडे माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलने २१ पैकी तब्बल १९ जागा मिळवत जिल्हा बँकेवरील आपले वर्चस्व कायम राखले.त्यामुळे जिल्हा बँकेच्या या निवडणुकीत सहकार पॅनलचा विजय झाला असला, तरी राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे तो ‘परिवर्तन’च्या दोन जागांचा आणि त्या दोन जागांमागील राजकीय ओळखींचा.‘घड्याळ’साठी एवढा अट्टाहास... सुनेत्रा पवारांचा व्हिडिओ संदेश... कायंदेंची धडपड... पण शेवटी जिल्हा बँकेत पोहोचले कोण? एक भाजपचा, एक काँग्रेसचा!
हा निकाल आता बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणात नव्या चर्चेला तोंड फोडणारा ठरत आहे.