जिल्ह्यातील ११ नगर परिषदांच्या प्रभागनिहाय आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; ८ ऑक्टाेबर राेजी संबधीत पालिकांच्या कार्यालयात निघणार साेडत; साेडतीसाठी एसडीओंची जिल्हाधिकाऱ्यांनी केली नियुक्ती...
Oct 6, 2025, 18:49 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार आणि राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार बुलढाणा जिल्ह्यातील ११ नगर परिषदांच्या प्रभागनिहाय आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ही सोडत ८ ऑक्टोबर २०२५ रोजी संबंधित नगर परिषदांच्या कार्यालयात पार पडणार आहे.या साेडतीसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील तरतुदीनुसार तसेच “महाराष्ट्र नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक (आरक्षण) आदेश २०२५” नुसार ही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, प्रत्येक नगर परिषदेच्या सोडतीसाठी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात येईल.
बुलढाण्याचे उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुलढाणा पालिकेत ८ ऑक्टाेबर राेजी सकाळी ११ वाजता व चिखलीत दुपारी ३ वाजता प्रभाग निहाय आरक्षण जाहीर करण्यात येणार आहे. सिंदखेड राजाचे एसडीओ संजय खडसे यांच्या अध्यक्षतेखाली ८ ऑक्टोबर दुपारी ११.००, देऊळगाव राजात दुपारी ३.०० वाजता आरक्षण साेडत काढण्यात येणार आहे.
मेहकरचे एसडीओ रविंद्र जाेगी यांच्या अध्यक्षतेखाली मेहकर पालिकेत सकाळी ११ वाजता तर लाेणार पालिकेत दुपारी ३.०० वाजता, खामगावचे एसडीओ रामेश्वर पुरी यांच्या उपस्थितीत खामगावात सकाळी ११ वाजता तर शेगावात दुपारी ३ वाजता, जळगाव जामाेदचे एसडीओ शैलेश काळे यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव जामाेदमध्ये सकाळी ११ वाजता तर शेगावमध्ये दुपारी ३ वाजता, मलकापूरचे एसडीओ संताेष शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नांदुऱ्या सकाळी ११ वाजता तर मलकापुरात दुपारी ३ वाजता आरक्षण साेडत निघणार आहे. या आरक्षण साेडतीकडे आता इच्छुकांचे लक्ष लागले आहे.