तांदूळवाडीतील गणेशोत्सवातील हवेत गोळीबार करतानाच्या वायरल व्हिडिओच सत्य समोर; बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी केला खुलासा!
Updated: Sep 29, 2026, 20:41 IST
बुलडाणा (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : बुलढाणा तालुक्यातील तांदूळवाडी येथे गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान एका तरुणाने हवेत गोळीबार केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर परिसरात एकच चर्चा सुरू झाली. मात्र, या व्हायरल व्हिडिओमागील सत्य आता बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान तांदूळवाडी येथे कोणत्याही प्रकारचा गोळीबार झालेला नाही, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारी बंदूक ही ओरिजनल बंदूक नसून जनावरांना हाकलण्यासाठी वापरली जाणारी बंदूक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
विशेष म्हणजे, सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलेला व्हिडिओ हा तांदूळवाडी येथील गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यानचा नसल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे. जुना व्हिडिओ आणि गणेश विसर्जन मिरवणुकीचा व्हिडिओ एकत्रित करून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या कोणत्याही व्हिडिओवर तात्काळ विश्वास न ठेवता त्याची सत्यता पडताळून पाहावी, असं आवाहन बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आशिष रोही यांनी केले आहे.