प्रस्तावित कचरा डेपोविरोधात ग्रामस्थांचा आक्रोश; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला शेकडोंचा मोर्चा
Oct 1, 2026, 15:24 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : बुलढाणा शहरालगत माळविहीर ग्रामपंचायत हद्दीत प्रस्तावित असलेल्या कचरा डेपोविरोधात सावळा, सुंदरखेड आणि माळविहीर येथील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. बुलढाणा नगरपरिषदेच्या माध्यमातून प्रस्तावित करण्यात आलेला कचरा डेपो रद्द करावा, या मागणीसाठी आज शेकडो ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
चिखली रोड मार्गे निघालेल्या या मोर्चात माळविहीर, सुंदरखेड आणि सावळा गट ग्रामपंचायतीमधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विविध घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडत ग्रामस्थांनी प्रस्तावित कचरा डेपोला तीव्र विरोध दर्शविला.
प्रस्तावित कचरा डेपोमुळे परिसरातील नागरिकांसह शाळकरी मुलांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. कचऱ्यामुळे दुर्गंधी, प्रदूषण तसेच आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, प्रशासनाने ग्रामस्थांच्या मागण्यांची तातडीने दखल घेऊन प्रस्तावित कचरा डेपो रद्द करावा, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशाराही स्थानिक नागरिकांनी दिला आहे.