केसापुरात वीर जवान स्मृती चषकाचे वीर पित्याच्या हस्ते उद्घाटन! हिरकणी महिला अर्बनच्या वतीने विजेत्या संघाला मिळणार ५१ हजार रुपये;
क्रिकेटच्या मैदानात दोन चेंडू डॉट खेळणाऱ्या राहुलभाऊंची शाब्दिक फटकेबाजी! म्हणाले, मी आमदार नाही, माझ्याकडे ठेकेदार नाही,तरी...
यावेळी बोलतांना राहुल बोंद्रे म्हणाले की, केसापुर सारख्या छोट्याश्या गावातून अनेक सैनिक देशाची सेवा करण्यासाठी सीमेवर लढतात ही गौरवाची बाब आहे. वीर जवान दत्तात्रय निकम यांनी देशासाठी आयुष्य खर्ची घातले, त्यांची प्रेरणा केवळ गावातीलच नव्हे तर सगळ्याच तरुणांनी घेतली पाहिजे. वेळप्रसंगी रक्त गोठवणाऱ्या उणे २५ डीग्री तापमानात देशाचे सैनिक जीवाची बाजी लावतात,कशाचीही पर्वा करीत नाहीत..मात्र देशासाठी जगण्याचा मरण्याचा ठेका काय फक्त जवानांनी घेतला काय असा संवेदनशील प्रश्न यावेळी माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी उपस्थित केला.
देशात लोकशाहीचे नरडे घोटण्याचे काम सुरू..
क्रिकेट हा सांघिकता निर्माण करणारा खेळ आहे. ११ खेळाडू एकजीवाने आपल्या संघासाठी खेळतात. कोणता खेळाडू कोणत्या जातीचा, धर्माचा ,पंथाचा हा भेदभाव क्रिकेटच्या खेळात दिसत नाही. प्रत्येक खेळाडूचे स्वतःचे वेगळे कौशल्य असते मात्र विविधतेत असलेली एकता संघाला जिकवते असेही राहुल बोंद्रे यावेळी म्हणाले. देशाचे रक्षण करणारे जवान वेगळया वेगळ्या जातींचे,धर्मांचे पंथांचे असले तरी देशासाठी सीमेवर ते भारतीय असतात. सर्वधर्म समभाव आम्हाला घटनेने शिकवला मात्र सध्या सर्वधर्म समभाव धोक्यात आहे. लोकशाहीचे नरडे घोटण्याचे काम सध्या देशात सुरू आहे, असे सुरू असताना आपले रक्त पेटून उठत नसेल तर काय फायदा? सैनिक सीमेवर देशाचे रक्षण करतील पण लोकशाहीचे रक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे असेही ते म्हणाले.
मी काय आमदार नाही, माझ्याकडे ठेकेदार नाही..!
ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये चांगले कौशल्य आहे, हे कौशल्य वाढीस लागले पाहिजे. त्यासाठी क्रिकेट स्पर्धा आवश्यक आहेत. तरुण अनेकदा काहीतरी मागण्यासाठी येतात मात्र मी काय आमदार नाही, माझ्याकडे ठेकेदार नाही..तरीही आलेल्या तरुणांना मी नाराज करीत नाही..कारण आमदार नसलो तरी इच्छाशक्ती असल्याने सगळ काही शक्य आहे.. तरुण चांगले काम करीत असतील तर त्यांच्या पाठीशी आपण राहिलेच पाहिजे असेही राहुल बोंद्रे म्हणाले. यावेळी पंचक्रोशीतील खेळाडू, मान्यवर व माताभगिनींची लक्षणीय उपस्थिती होती. आदित्य ११ क्रिकेट क्लब केसापुरच्या वतीने आयोजित या वीर जवान स्मृती चषकाचे प्रथम पारितोषिक हिरकणी महिला अर्बनच्या वतीने ५१००० हजार रुपये असणार आहे तर द्वितीय पारितोषिक २१ हजार रुपये असणार आहे.