चंदनपूर जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची पदे रिक्त;पालकांचा उद्रेक! शाळेला लावले कुलूप...
Nov 15, 2025, 14:27 IST
मेरा बु. (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : चंदनपूर येथील जिल्हा परिषद शाळेत गेल्या काही महिन्यांपासून शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षण विभागाकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने संतापलेल्या पालकांनी १४ नोव्हेंबर रोजी शाळेला कुलूप ठोकत आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.
चंदनपूर येथे १ली ते ७वीपर्यंतच्या वर्गांसह एकूण १७८ विद्यार्थ्यांची शाळा आहे. ज्यासाठी ७ शिक्षक नियुक्त होते. मात्र ऑनलाइन बदली प्रक्रियेतून दोन शिक्षकांची बदली झाली.
गावकऱ्यांना अपेक्षा होती की जागी दोन नवीन शिक्षक रुजू होतील; पण शिक्षण विभागाने फक्त एकच शिक्षक पाठवला, त्यामुळे अध्यापन कोलमडले.
विद्यार्थ्यांचे सातत्याने नुकसान होत असल्याचे पाहून पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीने संताप व्यक्त केला.
गटशिक्षण अधिकाऱ्यांची उडवाउडवी?
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मखाजी साळवे, सरपंच श्रीकांत इंगळे आणि गावकऱ्यांनी शिक्षकांच्या रिक्त पदांची माहिती गटशिक्षण अधिकारी वाघमारे यांना दिली; मात्र त्यांच्याकडून “उडवाउडवीची उत्तरे” मिळाल्याचा आरोप करण्यात आला.
केंद्रप्रमुख केवट यांनीही पालकांचे समाधान न केल्याने संताप आणखी वाढला.त्यामुळे पालकांनी १४ नोव्हेंबर रोजी शाळेला कुलूप लावला.
मखाजी साळवे म्हणाले की,
“शिक्षकांची तात्काळ नेमणूक न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू ठेवू. जबाबदारी शिक्षण विभागाचीच!”
सरपंच श्रीकांत इंगळे यांनी सांगितले की,
“चिखली शिक्षण विभागाने पूर्ण दुर्लक्ष केले आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्यासोबत खेळणे बंद करावे.”