UPDATE सोमठाणा तिहेरी हत्याकांडाचा थरार! मुख्य आरोपी दीपक सुरडकर फरारच; मुलगा जगदीश पोलिसांच्या ताब्यात, भांडणावेळी होता उपस्थित!
“खून माझ्या बापाने केला, मी नाही!” मुलाची पोलिसांसमोर कबुली? रणजीतने चुलत्याशी भिडण्यासाठी मित्रांना बोलावल्याची माहिती; दीपकच्या रुद्रावताराने मित्र मागच्या मागेच पळाले अन् पुढे तिघांचे मृतदेह!
सोमठाणा येथील सुरडकर कुटुंबात संजय, दीपक आणि अजय असे तीन भाऊ. वडील फत्तेसिंग सुरडकर सैन्यात होते. त्यांच्या निधनानंतर आई सरस्वतीबाईंना पेन्शन मिळत होती. कुटुंबाची एकत्रित ८ ते १० एकर शेती असल्याची माहिती आहे.
आईच्या नावावरील सुमारे दोन ते अडीच एकर जमीन संजयने आईला विश्वासात घेऊन स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा दीपकला राग होता, अशी माहिती पुढे येत आहे. याशिवाय आईच्या पेन्शनवरूनही दोघा भावांमध्ये नाराजी असल्याचे सांगितले जाते. या कारणांवरून कुटुंबात अनेक दिवसांपासून कुरबुरी सुरू असल्याची माहिती आहे.
आधी शेतात वाद, नंतर मुलाला फोन!
८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास संजय आणि दीपक यांच्यात शेतात वाद झाला. संजयच्या विहिरीतील जळालेली मोटार काढताना दीपकच्या मोटारीची वायर तुटल्याने दोघांमध्ये बाचाबाची झाली. दिपकने देखील संजयच्या मोटारसायकलचे वायर तोडल्याची माहिती आहे...त्यानंतर गावातील मध्यस्थांनी हस्तक्षेप करून हा वाद मिटवला. त्यानंतर दीपक घरी निघून गेला. दरम्यान, संजयने फोन करून मुलगा रणजीतला या वादाची माहिती दिली. त्यानंतर रणजीत शेलुद येथून सोमठाणा येथे आला. रणजीतने चुलत्याला जाब विचारण्यासाठी मित्रांनाही बोलावले होते, अशी माहिती समोर येत आहे.
दीपकचा रुद्रावत पाहून मित्र मागे फिरले?
प्राथमिक माहितीनुसार, दीपकच्या घरासमोर पुन्हा वाद उफाळला. यावेळी दीपक आक्रमक झाल्याचे सांगितले जाते. त्याचा रुद्रावतार पाहून रणजीतसोबत आलेले तरुण मागे फिरून निघून गेल्याची माहिती आहे.त्यानंतर नेमका घटनाक्रम काय घडला, याबाबत अधिकृत तपशील अद्याप समोर आलेला नाही. मात्र, या संघर्षात संजय आणि रणजीत यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला झाला.. दोघांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.
भाऊ-पुतण्यानंतर आईचीही हत्या; दीपक पसार
संजय आणि रणजीत यांच्यावर हल्ला केल्यानंतर दीपक शेजारी असलेल्या आई सरस्वतीबाई यांच्या घरात गेला आणि त्यांचीही हत्या केली.. त्यानंतर तो घटनास्थळावरून पसार झाला.या घटनेत सरस्वतीबाई फत्तेसिंग सुरडकर (७०), संजय फत्तेसिंग सुरडकर आणि रणजीत संजय सुरडकर यांचा मृत्यू झाला. या तिहेरी हत्याकांडामुळे सोमठाणा गावात खळबळ उडाली आहे.
दीपकचा मुलगा जगदीश पोलिसांच्या ताब्यात
घटनेवेळी दीपकचा २० वर्षीय मुलगा जगदीश उपस्थित असल्याची माहिती आहे. तोही घटनेनंतर निघून गेला होता. पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला जवळच्या सवणा गावातून ताब्यात घेतल्याचे समजते.
“खून माझ्या बापाने केला, मी नाही,” असे जगदीशने सांगितल्याची माहिती पुढे येत आहे. मात्र, या कथित वक्तव्याला पोलिसांकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. जगदीशची नेमकी भूमिका काय होती, त्याचा हत्याकांडात काही सहभाग आहे का, हे तपासानंतरच स्पष्ट होईल.
मुख्य आरोपीचा शोध सुरू; तपासातून काय उलगडणार?
आता या प्रकरणात पोलिसांसमोर महत्त्वाचे प्रश्न आहेत—जमिनीच्या वादातूनच हा संघर्ष झाला का? रणजीतसोबत आलेल्या तरुणांची नेमकी भूमिका काय? जगदीशने प्रत्यक्ष काय पाहिले? आणि तिहेरी हत्याकांडानंतर दीपक नेमका कुठे पसार झाला? मुख्य आरोपी दीपक सुरडकर पोलिसांच्या हाती लागल्यानंतरच हत्याकांडामागील नेमका घटनाक्रम आणि कारणांचा अधिकृत उलगडा होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत समोर येणाऱ्या माहितीकडे प्राथमिक तपशील म्हणूनच पाहणे आवश्यक आहे.