बुलडाण्यात अभूतपूर्व शिवजयंती! डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या मिरवणुकीला सुरुवात!
शिवस्मारकावर हेलिकॉप्टरने झाली पुष्पवृष्टी अन्...
Feb 19, 2024, 18:47 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):- बुलडाण्यात यंदाची शिवजयंती अभूतपूर्व अशी ठरत आहे. यंदाच्या मिरवणुकीत आतापर्यंत न पाहिलेले देखावे बुलडाणेकरांना पहायला मिळत आहे. विशेष म्हणजे नव्याने साकार झालेले शिवस्मारक समस्त बुलडाणा वसियांसाठी प्रेरणास्थळ बनले. रोषणाईने उजळून निघालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर संध्याकाळी पुष्पवृष्टी झाली. त्यांनतर संगम चौक येथून मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.
मिरवणुकीत ट्रॅक्टरवर छत्रपती शिवाजी महाराज, प्रभू श्रीराम, हनुमंतराय, जिजाऊ माँ साहेब यांचे भव्य पुतळे उभारले गेलेत. तसेच बंजारा समाजाचे पारंपरिक वाद्य, भस्मधारी साधू अश्या अनेक देखाव्यांनी डोळ्याचे पारणे फिटत असल्याची प्रतिक्रया व्यक्त होत आहे. हत्ती, घोडे, उंट व शिवरायांच्या तसेच मावळ्यांच्या वेशभूषात असलेले तरुण, चिमुकले पाहून शिवदरबार थाटल्या गेल्याचे भासवत आहे.
सोबतच डिजे,ढोलताशा पथकांनी उत्सवाचा जल्लोष निनादून जात आहे. हजारो शिवप्रेमी पारंपरिक वेषभूशा करून सहभागी होत आहे. संपूर्ण बुलडाणा शहर "शिवमय" झाल्याचे चित्र आहे. मिरवणुकी दरम्यान जनता चौकातील मुस्लिम बांधवांकडून शिवभक्तांसठी एनर्जी ड्रिंक्स ची व्यवस्था करण्यात आली आहे. कारंजा चौकात परिसरातील सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून पॅकेट फूडसची व्यवस्था करण्यात आली आहे. शहर पोलिसांनी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. शिस्तबद्ध पद्धतीने शोभायात्रा, मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.
अशी निघाली शोभायात्रा...
संगम चौकातील शिवस्मारकापासून शोभायात्रा सुरू झाली पुढे जयस्तंभ चौक, जनता चौक, कारंजा चौक मार्गे मिरवणुकीचा समारोप होणार आहे.