लोणार सरोवर व जिजाऊ जन्मस्थळाला केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत देणार भेट; केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांचे निमंत्रण स्वीकारले...
केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज दिल्ली येथे केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटनमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट घेऊन बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर व सिंदखेडराजा येथे भेट देण्याची तसेच पुरातत्त्व विभागाची बैठक बुलढाणा जिल्ह्यात घेण्याची विनंती केली. या निमंत्रणास पर्यटनमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हा दौऱ्यास येण्यास सहमती दर्शविली.
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे उल्कापातामुळे निर्माण झालेले जगविख्यात सरोवर आहे. या सरोवराला नुकताच रामसर सरोवराचा दर्जाही मिळाला आहे. मात्र सध्या लोणार सरोवरातील पाण्याची पातळी वाढत असल्याने परिसरातील अनेक प्राचीन मंदिरे जलमय होत आहेत. त्यामुळे ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जतन करण्याबाबत चिंता व्यक्त होत आहे. या विषयावर तज्ञांना पाचारण करून संशोधन करण्याची आवश्यकता असल्याचे मत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी श्रद्धाळूंच्या कुंडातील जलस्नानाबाबतही चर्चा झाली. पूर्वी या परिसरातील जलकुंडात भाविकांना स्नान करण्याची तसेच धारातीर्थ गोमुखातून कावड यात्रेसाठी पाणी घेऊन जाण्याची परवानगी होती. मात्र कोरोना काळात हे क्षेत्र प्रतिबंधित करण्यात आले होते. कोरोना कालावधी संपल्यानंतरही हे निर्बंध कायम असल्याने ते शिथिल करण्याबाबत पुरातत्त्व विभागाला सूचना देण्याची विनंतीही जाधव यांनी केली.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे आहे. येथे राजे लखोजी जाधव यांचा राजवाडा व इतर ऐतिहासिक वास्तू आजही अस्तित्वात आहेत. उत्खननादरम्यान येथे भगवान विष्णूची मूर्तीही आढळून आली असून धार्मिक भावनांचा आदर राखून तिची प्राणप्रतिष्ठा करून मंदिर उभारण्याची गरज असल्याचेही जाधव यांनी सांगितले.
तसेच या परिसरातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन व विकासासाठी निधीची आवश्यकता असून पर्यटन विभागामार्फत यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली. लोणार सरोवर आणि राजमाता जिजाऊंचे जन्मस्थळ ही दोन्ही महत्त्वाची पर्यटनस्थळे असल्याने येथील विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी केंद्रीय पर्यटनमंत्र्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन येथेच विकासात्मक बाबींवर बैठक घ्यावी, अशी विनंतीही यावेळी करण्यात आली.
या निमंत्रणास प्रतिसाद देत केंद्रीय पर्यटनमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी बुलढाणा जिल्हा दौऱ्याचे निमंत्रण स्वीकारले आहे.