देशात आयुर्वेद गुरुकुलम् महाविद्यालय आणि औषध परीक्षण प्रयोगशाळा सुरू करणाची केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी केली घोषणा;

 आयुर्वेद व आधुनिक उपचारांच्या समन्वयातून आरोग्यसेवा अधिक सक्षम होणार...

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : आयुर्वेद शिक्षण, संशोधन आणि औषधांच्या गुणवत्तापूर्ण परीक्षणाला चालना देण्यासाठी देशात आयुष मंत्रालयाच्या वतीने आयुर्वेद गुरुकुलम् महाविद्यालये सुरू करण्यात येणार असून, केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान अनुसंधान परिषदेच्या आठ परिघीय संस्थांमध्ये औषध परीक्षण प्रयोगशाळा (DTL) सुविधा विकसित करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय आयुष तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांनी आज बुलढाणा येथे केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘शाश्वत विकासाची अविरत २५ वर्षे – सेवासंकल्प अभियान’अंतर्गत जिल्हा स्त्री रुग्णालय येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार संजय गायकवाड, नगराध्यक्ष पूजा गायकवाड, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कैलास झिने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार, जिल्हा आरोग्य अधिकारी रणजित मंडाले, जिल्हा स्त्री रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.

केंद्रीय राज्यमंत्री श्री. जाधव म्हणाले की, नागरिकांचे आरोग्य निरोगी व सक्षम राहण्यासाठी आधुनिक वैद्यकीय उपचारांसोबत आयुर्वेद, योग आणि पारंपरिक उपचार पद्धतींचा समन्वय साधून एकात्मिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यावर केंद्र व राज्य शासनाचा भर आहे. विविध आजारांचे वेळीच निदान झाल्यास उपचार अधिक परिणामकारक ठरतात. त्यामुळे प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेला विशेष महत्त्व देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

आयुर्वेद व योगाला जागतिक स्तरावर मान्यता मिळत असून अनेक देशांकडून या उपचार पद्धतींबाबत माहिती व प्रशिक्षणाची मागणी होत आहे. आयुर्वेद, योग आणि आधुनिक वैद्यकीय उपचारांचा समन्वय झाल्यास नागरिकांना अधिक व्यापक आरोग्य सुविधा उपलब्ध होऊ शकतात. याच उद्देशाने देशभरात आयुष्मान आरोग्य मंदिरे तसेच आयुष विभागाच्या विविध सेवा कार्यान्वित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

दिल्ली येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या धर्तीवर देशाच्या विविध भागांत आयुर्वेद शिक्षण व संशोधनाच्या सुविधा निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आयुर्वेद व योगाचा प्रसार देशाच्या सीमांपलीकडे होत असून, २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन आणि २३ सप्टेंबर हा आयुर्वेद दिन म्हणून साजरा केला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. बुलढाणा येथील राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांना अधिक सक्षम आरोग्य सुविधा उपलब्ध होत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून भविष्यात राज्याच्या आरोग्य व्यवस्थेला मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. 

आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रतिवर्षी पाच लाख रुपयांपर्यंतच्या उपचाराची सुविधा दिल्या जात आहे. तसेच ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठीही आरोग्य संरक्षण दिले आहे. महागड्या उपचारांचा खर्च गरीब कुटुंबांवर पडू नये, उपचाराअभावी कोणालाही आजार लपवावा लागू नये आणि प्रत्येक नागरिकाला सन्मानाने व निरोगी जीवन जगता यावे, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. आरोग्य सेवा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना आणि उपक्रमांचा लाभ पात्र नागरिकांनी घ्यावा, असेही आवाहन प्रतापराव जाधव यांनी केले.

आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाणा येथे उपलब्ध होत असलेल्या वैद्यकीय व शैक्षणिक सुविधांची माहिती दिली. राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामुळे दरवर्षी १०० विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाची संधी मिळत आहे. कृषी महाविद्यालयात ६० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय असून, बी.एससी. नर्सिंग व आधुनिक पदवी अभ्यासक्रमांमुळे आरोग्य शिक्षण क्षेत्राला गती मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, योग व निसर्गोपचार पद्धतींचा एकत्रित लाभ नागरिकांना मिळावा यासाठी आयुर्वेद महाविद्यालयाच्या अनुषंगाने पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्ह्यात अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने बायपास सर्जरी, अँजिओप्लास्टी, क्रिटिकल केअर व न्यूरोसर्जरीसह विविध सुविधा विकसित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

५० खाटांच्या आयुष रुग्णालयाचे भूमिपूजन

सेवासंकल्प अभियानांतर्गत जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरात ५० खाटांच्या सुसज्ज आयुष रुग्णालयाचे भूमिपूजन केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. या रुग्णालयामुळे जिल्ह्यातील गोरगरीब व गरजू नागरिकांना आयुष उपचार पद्धतींच्या माध्यमातून आरोग्यसेवेचा  पर्याय उपलब्ध होणार आहे.

 आयुर्वेद गुरुकुलम् महाविद्यालय 

 प्रतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून देशभर आयुष मंत्रालयाच्यावतीने आयुर्वेद गुरुकुलम् महाविद्यालय सुरू करणार आहे. आयुर्वेद गुरुकुलम् ही निवासी आयुर्वेद संस्था असून, येथे दोन वर्षांचा प्री-आयुवेदा कार्यक्रमासह साडेसात वर्षांचा बीएएमएस पदवी अभ्यासक्रम राबविला जाईल. अध्यापनाचे माध्यम संस्कृत असेल.

इयत्ता १० वी नंतर NEET द्वारे प्रवेश दिला जाईल. सर्व गुरुकुलम् केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, जनकपुरी, नवी दिल्ली यांच्याशी संलग्न असतील. पूर्व-आयुर्वेद अभ्यासक्रमात संस्कृत, इंग्रजी/भारतीय भाषा, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित, भारतीय दर्शन-शास्त्रे आणि आयुर्वेदाची ओळख यांचा समावेश असेल. शैक्षणिक वर्ष २०२६–२७ पासून महाराष्ट्र, आसाम, उत्तराखंड, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या ५ राज्यांकडून आयुर्वेद गुरुकुलम् स्थापनेसाठी प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.

केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान अनुसंधान परिषद परिघीय संस्थांमध्ये औषध परीक्षण प्रयोगशाळा 

 आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान अनुसंधान परिषदच्या आठ परिघीय संस्थांमध्ये DTL सुविधा विकसित करण्यात येणार आहे. यामुळे आयुर्वेद, सिद्ध व युनानी (ASU) औषधांची गुणवत्ता तपासणी, प्रमाणीकरण आणि मानकीकरण अधिक सक्षम होईल. पुणे, पटियाला, जम्मू, कोलकाता, गुवाहाटी, भुवनेश्वर, चेरुथुरुथी आणि बंगळुरू येथे या सुविधांचे संचालन/बळकटीकरण करण्यात येणार आहे. या नेटवर्कमुळे विकेंद्रित औषध परीक्षण सुविधा, जलद तपासणी, संशोधन व गुणवत्ता हमी यांना चालना मिळून देशभर ASU औषधांच्या गुणवत्तापूर्ण परीक्षणासाठी राष्ट्रीय DTL नेटवर्क निर्माण होईल.