पांगरी माळी शिवारात दुर्दैवी दुर्घटना; गोठ्यात झोपलेल्या शेतकऱ्यावर पत्र्याचे छप्पर कोसळले; शेतकऱ्यासह दोन बकऱ्यांचा मृत्यू....
Jul 2, 2025, 09:50 IST
देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): देऊळगाव राजा तालुक्यातील पांगरी माळी शिवारात सोमवारी रात्री घडलेल्या एक दुर्दैवी घटनेत गोठ्यावरचे पत्र्याचे छप्पर आणि लोखंडी अँगल कोसळल्याने ५५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. या अपघातात दोन बकऱ्यांचाही मृत्यू झाला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
विलास विठ्ठल सोनुने (वय ५५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. नेहमीप्रमाणे ते रात्री झोपण्यासाठी बकऱ्यांच्या गोठ्यात गेले होते. मात्र, अचानक गोठ्यावरील पत्र्याची झडप व लोखंडी अँगल कोसळली आणि त्यात दबून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना रात्री उशिरा प्रकाश सोनुने यांच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने विलास यांचे बंधू अवचित सोनुने व मुलाला माहिती दिली. काही क्षणांतच सर्वांनी घटनास्थळी धाव घेतली. दबलेल्या अवस्थेत बाहेर काढून त्यांना तातडीने देऊळगाव राजा येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर मृत घोषित केले.
या दुर्घटनेची नोंद देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक आशिष रोही यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल माधव कुटे करीत आहेत. विलास सोनुने यांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे...