बुलढाण्याच्या दोन सुपुत्रांनी गाजवला पश्चिम महाराष्ट्राचा व्हॉईस ऑफ मिडिया कॅडर कॅम्प! राष्ट्रीय अध्यक्ष अनिल म्हस्के,
सांगली जि.प.चे सीईओ विशाल नरवाडे एकाच व्यासपीठावर; सांगलीत विभागीय कॅडर कॅम्प उत्साहात...
विशेष म्हणजे, या कार्यक्रमाच्या निमित्ताने बुलढाण्याच्या मातीतून पुढे आलेले दोन सुपुत्र एकाच व्यासपीठावर आले. व्हॉईस ऑफ मिडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल म्हस्के हे बुलढाणा जिल्ह्याचे भूमिपुत्र असून, त्यांच्या नेतृत्वाखाली संघटनेने देशभरात विस्तार केला आहे. पत्रकारांच्या हक्कांसोबतच सकारात्मक आणि मूल्याधारित पत्रकारितेला प्रोत्साहन देणे तसेच पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी विविध उपक्रम राबविणे, हा संघटनेच्या कार्याचा केंद्रबिंदू आहे.दुसरीकडे, मूळचे बुलढाणा जिल्ह्याचे सुपुत्र असलेले IAS विशाल नरवाडे सध्या सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. प्रशासकीय सेवेत कार्यरत असलेल्या नरवाडे यांना व्हॉईस ऑफ मिडियाच्या पश्चिम महाराष्ट्र टीमकडून या कॅडर कॅम्पसाठी विशेष निमंत्रण देण्यात आले होते.
पत्रकारिता आणि प्रशासन या दोन वेगवेगळ्या क्षेत्रांत कार्यरत असलेले बुलढाण्याचे हे दोन्ही सुपुत्र सांगलीत एकाच व्यासपीठावर आल्याने उपस्थितांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. अनिल म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार संघटनेची राष्ट्रीय स्तरावरील वाटचाल आणि विशाल नरवाडे यांची प्रशासकीय क्षेत्रातील कारकीर्द, यामुळे बुलढाणा जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला.
या कॅडर कॅम्पमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील व्हॉईस ऑफ मिडियाचे पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले होते. संघटनेची कार्यपद्धती, पत्रकारितेतील मूल्ये, सकारात्मक पत्रकारिता आणि पत्रकारांच्या कुटुंबीयांच्या सर्वांगीण विकासासाठी संघटनेची भूमिका यावर यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.सांगलीत पार पडलेल्या या कॅडर कॅम्पचे आणखी एक वैशिष्ट्य ठरले ते म्हणजे बुलढाण्याच्या दोन सुपुत्रांची एकाच व्यासपीठावर झालेली भेट. त्यामुळे हा कॅडर कॅम्प केवळ संघटनात्मक कार्यक्रम न राहता बुलढाण्याच्या दृष्टीनेही अभिमानाचा क्षण ठरला.