सर्वोच्च न्यायालयाचे २ न्यायमूर्ती, उच्च न्यायालयाचे  मुख्य न्यायमूर्ती शनिवारी बुलडाण्यात! ॲड.विजय सावळेंनी सांगितले कार्यक्रमाचे नियोजन.....

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सर्वोच्च न्यायालयाचे २ न्यायमूर्ती , उच्च न्यायालयाचे  मुख्य न्यायमूर्ती शनिवारी २४ ऑगस्ट रोजी बुलडाण्यात येत आहेत. आज,२२ ऑगस्ट रोजी पत्रकार भवनात वकील संघाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत वकील संघाचे अध्यक्ष ॲड. विजय सावळे यांनी याबाबतची माहिती दिली.
बुलडाणा येथील जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीचा कोनशिला समारंभ शनिवारी, २४ ऑगस्टला सकाळी ११ वाजता होणार आहे. सात मजल्याची ही नवीन इमारत असणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री. भूषण रा.गवई यांच्या शुभहस्ते कोनशिला समारंभ होणार आहे. या सोहळ्याला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती.श्री.प्रसन्न वराळे, उच्च न्यायालय मुंबई चे मुख्य न्यायमूर्ती श्री. देवेंद्र कुमार उपाध्याय हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालक न्यायाधीश श्री. नितीन वा. सांबरे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार असून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.स्वप्निल चंद्रकांत खटी यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार आहे. कोनशिला समारंभनंतर सहकार विद्या मंदिराच्या सभागृहात माननीय न्यायमूर्तींच्या प्रमुख उपस्थितीत स्वागत समारोह व कायदेशीर जनजागृतीचा कार्यक्रम देखील पार पडणार असल्याची माहिती वकील संघाचे अध्यक्ष ॲड. विजय सावळे यांनी दिली..
पोलिसांचा तगडा बंदोबस्त...
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना झेड दर्जाची सुरक्षा असल्याकारणाने पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनात बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.