२८ जूनला जिल्हाभर 'दोन थेंब'ची महासुरुवात! २.३० लाख बालकांपर्यंत पोहोचणार पोलिओ प्रतिबंधक लस! बसस्थानकांपासून वीटभट्ट्यांपर्यंत विशेष लक्ष; ६ हजारांहून अधिक कर्मचारी मोहिमेसाठी सज्ज...
जिल्ह्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की पोलिओ हा आयुष्यभरासाठी अपंगत्व निर्माण करू शकणारा गंभीर आजार आहे. त्यामुळे ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब देणे अत्यावश्यक आहे. पालकांनी कोणतीही हलगर्जी न करता आपल्या पाल्यांना जवळच्या पोलिओ बूथवर घेऊन जाऊन लसीकरण करून घ्यावे.
माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. मिलिंद जाधव यांनीही नागरिकांना आवाहन करताना स्पष्ट केले की, नियमित लसीकरण पूर्ण झालेल्या बालकांनाही पल्स पोलिओचे दोन थेंब देणे आवश्यक आहे. त्यामुळे कोणतेही बालक या मोहिमेपासून वंचित राहू नये, यासाठी पालकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा.
यंदाच्या मोहिमेत बसस्थानके, रेल्वे स्थानके, वीटभट्ट्या, बांधकामस्थळे, स्थलांतरित मजूर व भटक्या कुटुंबांच्या वस्त्यांमधील बालकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. विविध विभागांच्या समन्वयातून जनजागृती उपक्रम राबवून प्रत्येक पालकापर्यंत मोहिमेचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
"दोन थेंब जीवनाचे" हा संदेश घेऊन येणारी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी २८ जून रोजी प्रत्येक पालकाने आपल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकाला पोलिओचे दोन थेंब अवश्य पाजावेत, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.