अकरा दिवसांपासून तुपकरांच्या पायाला भिंगरी; गावागावांत दुष्काळ संघर्ष यात्रेला शेतकरी-शेतमजुरांचा तुफान प्रतिसाद! कुठे विराट सभा, तर कुठे संघर्षासाठी मदतनिधीचा ओघ;
४ डिसेंबरचा एल्गार महामोर्चा ऐतिहासिक करण्यासाठी गावगाडा सरसावला, राज्याचे लक्ष बुलढाण्याकडे...!
क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी १४ नोव्हेंबर रोजी मलकापूर येथील पुलवामा हल्ल्यात शहीद झालेले जवान संजयसिंह राजपूत यांच्या स्मारकाला अभिवादन करून दुष्काळ संघर्ष यात्रेला सुरुवात केली होती. मलकापूर, नांदुरा, जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव आणि खामगाव या घाटाखालील तालुक्यांतून मिळालेल्या प्रतिसादानंतर यात्रा घाटावर दाखल झाली. हेक्टरी एक लाख रुपयांची दुष्काळी मदत, सरसकट कर्जमुक्ती, नव्याने पीककर्ज, हक्काचा पीकविमा, सिबिलच्या जाचातून मुक्तता, मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या सक्तीच्या वसुलीला स्थगिती, शेतमजूर व भूमिहीनांना आर्थिक मदत, तसेच सोयाबीन-कापसाला रास्त भाव या मागण्यांसाठी तुपकर गावागावांत शेतकऱ्यांना संघटित करत आहेत. ही यात्रा केवळ दुष्काळी मदत, शेतमालाला भाव किंवा कर्जमाफीपुरती मर्यादित नसून संपूर्ण गावगाडा वाचविण्यासाठीचा हा संघर्ष असल्याची भूमिका तुपकर मांडत आहेत. पद, प्रतिष्ठा, पक्ष आणि राजकारण बाजूला ठेवून शेती आणि मातीसाठी एकत्र येण्याचे आवाहन ते करत असून, त्यांच्या आवाहनाला ग्रामीण भागातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
२२ नोव्हेंबर रोजी उकळी, सुकळी, मेहकर, अंजनी, अंथरूड, वरुड, घाटपुरी, टेंभुर्णी, खेड, विश्वी, जनुना, पांगरखेड, बेलगाव, गोहोगाव आणि तांदळे या गावांतून यात्रेने मार्गक्रमण केले. तर २३ नोव्हेंबर रोजी भुमराळा, आरेगाव, जवळा, चिंचोली बोरे, वडगाव तेजन, शाळा, देऊळगाव कुंभार, चिंचोली सांगळे, पारडा, दराडे, येवती आणि झरा या गावांना यात्रेने भेट दिली. भुमराळा आणि गोहोगाव दांदडे येथे झालेल्या सभांना शेतकरी, शेतमजूर, महिला आणि युवकांची मोठी उपस्थिती होती. दुष्काळामुळे निर्माण झालेली आर्थिक कोंडी, उद्ध्वस्त झालेली पिके, वाढते कर्ज आणि ग्रामीण भागातील रोजगाराचा प्रश्न यावर तुपकर यांनी परखड भूमिका मांडली. ४ डिसेंबर रोजी बुलढाण्यात होणाऱ्या एल्गार महामोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याची ग्वाही यावेळी ग्रामस्थांनी दिली. सलग अकरा दिवस गावागावांत फिरून तुपकर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जनजागृती करत असून, महामोर्चासाठी ग्रामीण भागात वातावरण तयार होत आहे. दुष्काळग्रस्तांचा वाढता असंतोष आणि यात्रेतून दिसणारी शेतकऱ्यांची एकजूट पाहता ४ डिसेंबरच्या महामोर्चानंतर राज्य सरकार कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कुणी जिवलगाच्या स्मृतीप्रित्यर्थ, तर कुणी स्वयंस्फूर्तीने दिला निधी; गावागावांतून संघर्षाला आर्थिक बळ!
दुष्काळ संघर्ष यात्रेला मिळणाऱ्या प्रतिसादासोबतच गावागावांतून आर्थिक मदतीचाही ओघ सुरू झाला आहे. पांगरखेड तेली येथे रविकांत तुपकर यांनी आपले जिवलग सहकारी स्व. संदीप नालिंदे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी संदीपभाऊंच्या मातोश्री आणि बंधू दीपक नालिंदे यांनी त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दुष्काळ संघर्ष यात्रेसाठी ११ हजार रुपयांचा निधी दिला. आरेगाव येथील संतोष धोंडजी टाले यांनी २ हजार १०० रुपये, माजी सरपंच शंकरराव टाले यांनी १ हजार १०० रुपये, संजय दत्तात्रय टाले यांनी १ हजार १०० रुपये, तर गोहोगाव दांदडे येथील डॉ. वसंत बोरकर यांनी ११ हजार रुपयांचे योगदान दिले. या पाच देणग्यांच्या माध्यमातून एकूण २६ हजार ३०० रुपयांचा निधी यात्रेला मिळाला. ही मदत केवळ आर्थिक योगदान नसून आमच्या संघर्षावर आणि शेतकरी चळवळीवर दाखवलेला विश्वास आहे. हाच विश्वास सोबत घेऊन शेतकरी-कष्टकऱ्यांच्या हक्काचा लढा अधिक ताकदीने सुरू ठेवू, अशा भावना रविकांत तुपकर यांनी व्यक्त केल्या.