मुंबई आंदोलनाआधी तुपकर भूमिगत; पोलिसांचा चौफेर वेढा! शिलेदारांची धरपकड, समृद्धीवर नाकाबंदी; उद्या मंत्र्यांच्या बंगल्यांचा-गाड्यांचा लिलाव करण्याच्या घोषणेने सरकारची झोप उडाली.....
विशेष म्हणजे, उद्या २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता मंत्रालय परिसरातील मंत्र्यांचे शासकीय बंगले आणि वाहनांचा प्रतीकात्मक जाहीर लिलाव करण्याची घोषणा तुपकरांनी केली आहे. त्यामुळे उद्याच्या आंदोलनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असून, सरकार आणि पोलिस प्रशासनासमोरही मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
तुपकरांचा फोन बंद; नेमके कुठे आहेत?
रविकांत तुपकर काल सकाळपासून पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती आहे. त्यांचा मोबाईल फोन बंद येत असून, पोलिसांकडून त्यांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे समजते. मात्र, तुपकर सध्या नेमके कुठे आहेत, याबाबत कमालीची गुप्तता पाळली जात आहे.
दुसरीकडे, ‘काहीही झाले तरी तुपकर आंदोलनस्थळी पोहोचतीलच’, असा विश्वास त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईला चकवा देत तुपकर उद्या थेट मुंबईत धडकणार का, याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
‘क्रांतिकारी’च्या शिलेदारांवर पोलिसांचा वॉच!
तुपकरांच्या मुंबई आंदोलनाला जाणाऱ्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिस प्रशासनानेही कंबर कसल्याचे दिसत आहे. खामगाव येथील क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते शुभम राऊत यांना पहाटे त्यांच्या घरातून स्थानबद्ध करण्यात आल्याची माहिती यापूर्वीच समोर आली आहे.
यानंतर बुलढाणा, खामगाव, चिखली परिसरातील क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या घरांभोवती पोलिसांच्या फेऱ्या सुरू असल्याची माहिती मिळत आहे. काही कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक कारवाईखाली स्थानबद्ध करण्यात येत असल्याचेही सांगितले जात आहे.
त्यामुळे ‘मुंबईला जाण्याआधीच आंदोलकांना रोखा’, अशीच पोलिसांची रणनीती असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
समृद्धी महामार्गावर पोलिसांचा पहारा; गाड्यांची तपासणी!
मुंबईकडे जाणाऱ्या संभाव्य आंदोलकांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी समृद्धी महामार्गावरील टोलनाक्यांवर आणि महत्त्वाच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आल्याची माहिती आहे. संशयित वाहनांची तपासणी केली जात असून, तुपकर समर्थकांच्या संभाव्य हालचालींवर पोलिसांची नजर असल्याचे समजते.त्यामुळे बुलढाण्यातून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गांवर पोलिसांचा वॉच वाढला आहे. मात्र, पोलिसांचा हा पहारा तुपकरांच्या आंदोलनाची धार रोखू शकतो का, हा खरा प्रश्न आहे.
नोटीस मिळाली, तरी तुपकरांचा ‘एल्गार’ कायम!
यापूर्वीच बुलढाणा शहर पोलिसांनी रविकांत तुपकरांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ मधील कलम १६८ अन्वये नोटीस बजावली होती. मात्र, नोटीस, पोलिसांचा बंदोबस्त आणि कार्यकर्त्यांवरील प्रतिबंधात्मक कारवाई यापैकी कशालाही न जुमानता तुपकरांनी २७ ऑगस्टला मुंबईत आंदोलन होणारच, अशी भूमिका कायम ठेवली आहे.शेतकऱ्यांच्या मागण्यांमध्ये नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांऐवजी दोन लाख रुपये प्रोत्साहन अनुदान, पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, जुन्या कर्जमाफी योजनांपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना न्याय, कर्ज पुनर्गठनामुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचा समावेश आदी मागण्यांचा समावेश आहे.
‘शेतकऱ्यांच्या पोरांना तुरुंगात टाकून आवाज दाबता येणार नाही!’
कार्यकर्त्यांवर सुरू असलेल्या कारवाईवर तुपकरांनी सरकार आणि पोलिस प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “शेतकऱ्यांच्या पोरांना तुरुंगात टाकून, अटक करून किंवा स्थानबद्ध करून या चळवळीचा आवाज दाबता येणार नाही. कितीही पोलिस कारवाया करा, आंदोलन थांबणार नाही,” असा थेट इशारा तुपकरांनी दिला आहे.
लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार संविधानाने दिला असल्याचे सांगत सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
उद्या सकाळी १० वाजता काय होणार?
२७ ऑगस्टच्या आंदोलनासाठी तुपकरांनी घेतलेली आक्रमक भूमिका आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. मंत्रालय परिसरातील मंत्र्यांचे शासकीय बंगले आणि वाहनांचा प्रतीकात्मक लिलाव करण्याच्या घोषणेने या आंदोलनाला वेगळेच वळण मिळाले आहे.
एकीकडे तुपकरांचा शोध सुरू असल्याची माहिती, दुसरीकडे कार्यकर्त्यांची धरपकड, समृद्धी महामार्गावरील पोलिस बंदोबस्त आणि मुंबई पोलिसांचा अलर्ट—या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. पोलिसांचा वेढा भेदून तुपकर मुंबईत पोहोचणार का? ‘क्रांतिकारी’चे शिलेदार किती संख्येने मुंबईत धडकणार? आणि सकाळी १० वाजता तुपकरांनी जाहीर केलेल्या लिलावाच्या आंदोलनाचे नेमके काय पडसाद उमटणार?याकडे आता केवळ बुलढाणा जिल्ह्याचे नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.