तुपकरांना ‘येलो गेट’नंतर हलवले कुलाबा पोलिस ठाण्यात ! मंत्र्यांच्या बंगल्यासमोर-मंत्रालयासमोरही गनिमी काव्याने आंदोलक पोहोचलेच !
तुपकरांचा मोबाईल जप्त, औषधांच्या गोळ्याही घेऊ दिल्या जात नसल्याची माहिती; शेकडो शिलेदार वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात ताब्यात
शेकडो कार्यकर्ते मुंबईच्या वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत
तुपकरांच्या आंदोलनाला रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी मोठी मोर्चेबांधणी केली आहे. मुंबईच्या वेगवेगळ्या भागांतून आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांना विविध पोलिस ठाण्यांमध्ये नेण्यात आले आहे. अनेक महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मरीन ड्राईव्ह परिसरातही सकाळपासून कार्यकर्त्यांची धरपकड सुरू होती. आमदार निवास परिसरातून क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष डॉ. टाले यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. मंत्रालय परिसरातील झाडांनाही पोलिस सुरक्षा देण्यात आली होती. मात्र, या सर्व बंदोबस्ताला छेद देत आंदोलकांनी थेट आंदोलनस्थळांपर्यंत मजल मारली.
मंत्र्यांच्या बंगल्यासमोरही पोहोचले आंदोलक!
मुंबईत ठिकठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असतानाही आंदोलकांनी गनिमी काव्याने मंत्र्यांच्या बंगल्यांसमोर आणि मंत्रालयासमोर पोहोचत घोषणाबाजी केली. अचानक आंदोलक समोर आल्याने पोलिसांची ऐनवेळी धावपळ उडाली. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारच्या भूमिकेचा निषेध केला.पोलिसांनी तत्काळ आंदोलकांना घेरून ताब्यात घेतले. त्यामुळे मंत्रालय परिसर आणि मंत्र्यांच्या बंगल्यांच्या परिसरात काही काळ चांगलीच खळबळ उडाली.
‘सरकार हमसे डरती है...’च्या घोषणांनी परिसर दणाणला!
तुपकरांसह कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला असता आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ‘सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है!’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. तुपकरांना आवरताना पोलिसांचीही चांगलीच दमछाक झाली.एकीकडे शेकडो कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत स्थानबद्ध केले जात असताना दुसरीकडे आंदोलकांनी पोलिसांचा पहारा चुकवत मंत्रालय आणि मंत्र्यांच्या बंगल्यांपर्यंत पोहोचून आंदोलनाचा निर्धार दाखवून दिला.
तुपकरांचे मोबाईल जप्त?
दरम्यान, रविकांत तुपकरांचे मोबाईल पोलिसांनी जप्त केल्याची माहिती समोर येत आहे. तुपकरांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या संपर्कावरही निर्बंध असल्याचे सांगितले जात आहे.
विशेष म्हणजे, तुपकरांना नियमित घ्याव्या लागणाऱ्या औषधांच्या गोळ्याही घेऊ दिल्या जात नसल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. त्यामुळे या मुद्द्यावरही आता त्यांच्या समर्थकांकडून संताप व्यक्त होण्याची शक्यता आहे.
तुपकरांचा लढा नेमका कोणत्या मागण्यांसाठी?
तुपकरांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मुंबई आंदोलनाची हाक दिली होती. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांऐवजी दोन लाख रुपये प्रोत्साहन अनुदान द्यावे, पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा, जुन्या कर्जमाफी योजनांपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा आणि कर्ज पुनर्गठनामुळे कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचाही कर्जमाफीमध्ये समावेश करावा, या प्रमुख मागण्या आहेत.
या मागण्यांसाठीच मंत्रालय परिसरातील मंत्र्यांचे शासकीय बंगले आणि वाहनांचा प्रतीकात्मक जाहीर लिलाव करण्याची घोषणा तुपकरांनी केली होती.
पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त, तरीही ‘क्रांतिकारी’ची धडक!
सकाळपासून मुंबई पोलिसांनी मंत्रालय, मंत्र्यांचे बंगले, मरीन ड्राईव्ह, आमदार निवास आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवला. कार्यकर्त्यांची आधीच धरपकड करण्यात आली. मंत्रालयातील झाडांनाही सुरक्षा देण्यात आली. मात्र, एवढ्या मोठ्या पोलिस बंदोबस्तानंतरही आंदोलक मंत्र्यांच्या बंगल्यासमोर आणि मंत्रालयासमोर पोहोचलेच!
आता तुपकरांना कुलाबा पोलिस ठाण्यात स्थानबद्ध करण्यात आले असून, शेकडो कार्यकर्ते मुंबईतील विविध पोलिस ठाण्यांत ताब्यात आहेत. त्यामुळे तुपकरांच्या मुंबई आंदोलनाचा हा पुढचा अंक आता नेमका कुठे आणि कसा वळतो, याकडे बुलढाण्यासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.