१० लाखांचे कर्ज घेतले, परतफेड न करता चेक बाऊन्स; चिखली न्यायालयाकडून दोन महिने शिक्षा आणि १ लाखाचा दंड! कर्ज न फेडणाऱ्यांना धडा...
May 15, 2025, 14:29 IST
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): "कर्ज घेताना सावधगिरी बाळगा, अन्यथा शिक्षा अटळ!" – हे पुन्हा सिद्ध झाले आहे. चिखली न्यायालयाने चेक बाऊन्सप्रकरणी मंगरूळ नवघरे येथील समाधान दौलत वाकडे याला २ महिन्यांची शिक्षा आणि १ लाख रुपयांचा दंड सुनावला आहे. हा निकाल प्रथमवर्ग न्यायाधीश एच. डी. देशींगे यांनी दिला.
घटना काय?
समाधान वाकडे यांनी २३ एप्रिल २०१८ रोजी राजर्षी शाहू मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी, मंगरूळ नवघरे शाखेतून १० लाखांचे कॅश क्रेडिट कर्ज घेतले होते. परंतु हप्ते थकवले गेले. परतफेडीच्या प्रयत्नात त्यांनी राष्ट्रीयकृत बँकेचा चेक दिला, मात्र खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने तो चेक वटला नाही.
पतसंस्थेने त्यांना नोटीस पाठवली, परंतु दखल न घेतल्यामुळे शाखा व्यवस्थापक शिवप्रसाद कणखर यांनी न्यायालयात दावा दाखल केला. साक्ष-पुराव्यानंतर न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत शिक्षा आणि दंड ठोठावला. फिर्यादीतर्फे ऍड. जयश्री कुटे यांनी युक्तिवाद सादर केला. हा निकाल कर्ज फेड न करणाऱ्यांसाठी धडा ठरेल, असा सूर नागरिकांमध्ये आहे.