दिशा फेडरेशनमुळे हजारो महिला प्रगतीच्या वाटेवर;जयश्रीताईंची वाटचाल कुणालाही रोखता येणार नाही; दिशा बचतगट फेडरेशनच्या मेळाव्यात ॲड गणेश पाटलांचे प्रतिपादन!
चित्रपट दिग्दर्शन निलेश जळमकर म्हणाले, जे राज्यपातळीवर होत नाही ते जयश्रीताईंनी बुलडाण्यात करून दाखवलं! महिला उद्योजक तथा बचतगट प्रदर्शनीचा थाटात शुभारंभ; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आयुष्यात प्रगतीची दिशा मिळते तेव्हा यशस्वी होण्याची वाटचाल कुणीही थांबवू शकत नाही. बचतगटांच्या माध्यमातून जयश्रीताई शेळके यांनी महिलांना स्वावलंबन आणि आर्थिक स्वातंत्र्याची मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. दिशा फेडरेशनमुळे हजारो महिला प्रगतीच्या वाटेवर आहेत, जयश्रीताईंची वाटचाल आता कुणीही रोखू शकत नाही असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष ऍड. गणेश पाटील यांनी केले.
बुलडाणा येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयासमोरील प्रांगणात ४ नोव्हेंबर रोजी आयोजित जिल्हास्तरीय महिला उद्योजक तथा बचतगट प्रदर्शनीच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. उदघाटन प्रसिद्ध दिग्दर्शक नीलेश जळमकर यांच्या हस्ते झाले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, आमदार धिरज लिंगाडे, राजेश एकडे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्याम उमाळकर, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, विजय अंभोरे, ज्येष्ठ नेते मुखत्यारसिंग राजपूत, प्रदेश सचिव डॉ.स्वातीताई वाकेकर, लक्ष्मण घुमरे, माजी सभापती दिलीप जाधव, रामविजय बुरुंगले, ऍड. गणेशसिंग राजपूत, सत्येंद्र भुसारी, हाजी रशीद खा जमादार, सुनील सपकाळ, रिजवान सौदागर, निसार चौधरी, गजानन मामलकर, माधुरीताई देशमुख, उषाताई चाटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महानायिकांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविकात दिशा बचतगट फेडरेशनच्या संस्थापक अध्यक्ष जयश्रीताई शेळके यांनी दिशा फेडरेशनच्या प्रगतीचा धावता आढावा घेतला. सहा वर्षांपूर्वी स्थापना झालेल्या फेडरेशनसोबत १५०० बचतगट संलग्न आहेत. हजारो महिला स्वावलंबी झाल्या आहेत. बचतगटांनी महिलांना पाठबळ, हिम्मत दिली. लघु उद्योजक बनण्याचा आत्मविश्वास दिला. ही मोठी उपलब्धी असल्याचे जयश्रीताई शेळके म्हणाल्या.
बचतगटांच्या माध्यमातून जयश्रीताई शेळके यांचे मोठे काम असून त्या समाजाला पुढे नेणारे नेतृत्व आहे, २०२४ च्या निवडणुकीत त्या नक्कीच एकतर केंद्रात किंवा राज्यात जाणार असे विजय अंभोरे म्हणाले. धीरज लिंगाडे यांनी जयश्रीताई शेळकेंचे कामाचे कौतुक करुन प्रत्येकाच्या सुख- दुःखात त्या सहभागी असतात असे सांगितले.जयश्रीताईंनी महिलांना आत्मनिर्भर करण्याचं काम केलं, असे आमदार राजेश ऐकडे म्हणाले. बचतगटांच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठा उद्योग उभा राहावा, असा आशावाद संजय राठोड यांनी व्यक्त केला. श्याम उमाळकर यांनी बचतगट चळवळीचा इतिहास सांगून हा आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग असल्याचे सांगितले. उपस्थित महिलांच्या एकजुटीचे त्यांनी कौतुक केले.
कार्यक्रमाचे उदघाटक नीलेश जळमकर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाचे कौतुक केले. जे आयोजन राज्यपातळीवर होत नाही तसे आयोजन जयश्रीताई यांनी बुलडाण्यात करून दाखवले. सावित्री भरपूर आहेत पण सावित्रीच्या पाठीशी उभे राहणारे ज्योतिराव गरजेचे आहे, असे ते म्हणाले. जयश्रीताईंनी महिलांसाठी केलेलं काम मोठे आहे. येणाऱ्या काळात बचतगटांच्या माध्यमातून उत्पादित झालेल्या मालाला विक्रीसाठी मोठे मार्केट उपलब्ध झाले पाहिजे, असे विचार राहुल बोंद्रे त्यांनी व्यक्त केले. संचलन शिप्रा मानकर यांनी केले तर आभार भारती कोल्हे यांनी मानले.