करपलेली सोयाबीन हातात घेऊन हजारो शेतकरी तहसीलवर धडकले; लोणारमध्ये अभूतपूर्व एल्गार! शेतकऱ्यांच्या तरुण मुलांनी आखला मोर्चा...

 
 लोणार(प्रेम सिंगी(:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पावसाने दिलेल्या प्रदीर्घ खंडाचा मोठा फटका खरीप हंगामातील पिकांना बसल्याने लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांचा संताप अखेर रस्त्यावर उतरला. करपलेली आणि नुकसानग्रस्त सोयाबीनची झाडे हातात घेऊन हजारो शेतकऱ्यांनी लोणार तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढत प्रशासनाचे लक्ष वेधले. लोणार तालुक्याच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा शेतकरी मोर्चा असल्याचा दावा आंदोलकांनी केला.

या मोर्चाचे आणखी एक वैशिष्ट्य ठरले ते म्हणजे शेतकऱ्यांच्या तरुण मुलांनी घेतलेला पुढाकार. कोणत्याही राजकीय पक्षाचे नेतृत्व किंवा राजकीय पाठबळ न घेता गावागावातील तरुण एकत्र आले आणि त्यांनी मोर्चाचे नियोजन केले. शेतकऱ्यांशी संपर्क साधण्यापासून ते प्रत्येक गावातून शेतकऱ्यांना लोणारपर्यंत आणण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यापर्यंतची जबाबदारी या तरुणांनी सांभाळली.

हातात करपलेली सोयाबीन; शेतकऱ्यांचा प्रशासनाला सवाल

यंदाच्या खरीप हंगामात पावसाने मोठा खंड दिल्याने लोणार तालुक्यातील शेती संकटात सापडली आहे. विशेषतः तालुक्यातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनवर पावसाच्या खंडाचा गंभीर परिणाम झाला असून अनेक ठिकाणी पिके शेतातच करपल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.उत्पादन हातातून जाण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी नुकसानग्रस्त सोयाबीनची झाडेच आंदोलनाचे प्रतीक बनवली. हातात करपलेली पिके घेऊन शेतकरी तहसील कार्यालयाकडे दाखल झाले आणि प्रशासनाने तातडीने दखल घेण्याची मागणी केली.

राजकारणापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य

या मोर्चाच्या आयोजनात शेतकऱ्यांच्या मुलांनी घेतलेला पुढाकार विशेष चर्चेत राहिला. गावागावातील तरुणांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून मोर्चासाठी वातावरण तयार केले. वाहनांची व्यवस्था, शेतकऱ्यांना एकत्र आणणे आणि आंदोलनाची रूपरेषा ठरविण्याची जबाबदारीही त्यांनी पार पाडली.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी त्यांच्या पुढच्या पिढीने उचललेले हे पाऊल तालुक्यात चर्चेचा विषय ठरले आहे.

शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

मोर्चाच्या अखेरीस शेतकरी प्रतिनिधींनी तहसीलदारांना निवेदन देत विविध मागण्या मांडल्या. त्यामध्ये—लोणार तालुका तातडीने कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करावा.
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करावेत.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी.
शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळावा.
शेती आणि कृषी पंपांसाठी २४ तास अखंडित वीजपुरवठा करावा.या मागण्यांवर प्रशासन काय निर्णय घेते, याकडे आता लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. करपलेल्या सोयाबीनच्या झाडांसह तहसीलवर पोहोचलेला हा शेतकरी एल्गार प्रशासनापर्यंत कितपत पोहोचतो आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत कधी मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.