श्रीं" च्या पुण्यतिथीनिमित्त विदर्भ पंढरीत हजारो भाविक नतमस्तक!४४८ दिंड्या अन १४ हजारावर वारकरी;
एक लाखावर भाविकांना महाप्रसादाचे वितरण..

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):"मी गेलो ऐसे मानू नका, भक्तीत अंतर करू नका, कदा मजलागी विसरू नका मी आहे येथेच ।" या संत गजानन महाराजांच्या वचनावर श्रध्दा ठेवत आज राज्यसह देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो भाविकांनी श्री संत गजानन महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवाला विदर्भ पंढरीत हजेरी लावली. गण गण गणात बोते चा गजर करत अध्यात्मिक अनुभूतीसह भाविक श्रींच्या मंदिरात नतमस्तक झाले.
श्री गजानन महाराज संस्थान संस्थानव्दारे ११४ वा श्री पुण्यतिथी उत्सव दि.०४/०९/२०२४ ते दि.०८/०९/२०२४ पर्यंत धार्मिक प्रथा-परंपरेनुसार संपन्न झाला. या उत्सवात दरारोज सकाळी ६.०० ते ६.४५ काकडा, ७.१५ ते ९.१५ गाथा भजन, दुपारी ४ ते ५ प्रवचन, सायंकाळी ५.३० ते ६ हरिपाठ व रात्री ८ ते १० श्रीहरी कीर्तन संपन्न झाले. सप्ताहात श्री ह.भ.प. संदिप बुवा डुमरे, कल्याण, श्री ह.भ.प. सुरेश बुवा वाकडे, पुसद, श्री ह.भ.प. प्रशांत बुवा ताकोते, सिरसोली, श्री ह.भ.प. भरत बुवा पाटील, म्हैसवाडी, श्री ह.भ.प. बाळु बुवा गिरगांवकर, गिरगांव आदी कीर्तनकारांचे कीर्तन संपन्न झाले. श्री गणेशयाग व वरूणयागास भाद्रपद शु. १ ला प्रारंभ होवून भाद्रपद शु. ५ ला सकाळी १० वाजता यागाची पुर्णाहूती झाली.
तसेच श्रींचे समाधि सोहळ्या निमित्य श्रीहरी कीर्तन होवून कार्यक्रम संपन्न झाला. यावर्षी श्री पुण्यतिथी उत्सवांत ४४८ दिंड्या व एकूण १४,११८ वारकरी येऊन गेलेत. यापैकी नियमांची पूर्तता केलेल्या एकूण ८७ नविन दिंड्यांना १० टाळ, १ विणा, १ मृदंग, श्री ज्ञानेश्वरी, श्री तुकाराम गाथा, श्री एकनाथी भागवत असे संत साहित्य आणि श्री माऊली पताका वितरीत करण्यात आल्या.जुन्या दिंड्यांना भजनी साहित्य दुरूस्तीकरीता नियमाप्रमाणे सानुग्रह अंशदान व इतर व्यवस्थेकरीता सहयोग देण्यात आला. तसेच उत्सवानिमित्य आलेल्या भजनी दिंड्यांमधील वारकऱ्यांची भोजनप्रसादाची व्यवस्था तसेच प्रथमोपचार केंद्राची सुविधा विसावा संकूल येथे करण्यात आली. तसेच उत्सव काळात श्री शेगांवसह श्री शाखा पंढरपूर, आळंदी, त्र्यंबकेश्वर, पंपासरोवर, ओंकारेश्वर, गिरडा अशा सर्व शाखांवर श्रींचा समाधि उत्सवानिमित्त स १ लाख ५ हजार भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.