लोणारमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ! चहा घेण्यासाठी थांबलेल्या व्यापाऱ्याच्या स्कार्पिओची काच फोडली; साडेतीन लाखांची रोकड घेऊन दुचाकीवरून पोबारा
मिळालेल्या माहितीनुसार, जालना येथील रहिवासी व सध्या केशव शिवणी येथे मुक्कामी असलेले कांदा बी व्यापारी दिलीप माधवराव खरले हे कांदा बी खरेदी करण्यासाठी पांगरा डोळे येथे आले होते. यावेळी ते लोणार शहरातील शेगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील लोणी नाक्याजवळील एका हॉटेलमध्ये चहा घेण्यासाठी थांबले होते.
खरले यांनी आपली स्कार्पिओ (एमएच २८ सीसी ५७५४) लॉक करून हॉटेलमध्ये प्रवेश केला. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने चालकाच्या सीटच्या मागील बाजूची खिडकी दगडाने फोडली. त्यानंतर गाडीमध्ये ठेवलेली थैली चोरट्याने लंपास केली. या थैलीमध्ये तब्बल ३ लाख ५० हजार रुपये रोख आणि महत्त्वाची कागदपत्रे असल्याचे पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
चोरी केल्यानंतर आरोपी आपल्या दुचाकीवरील साथीदारासह लोणी रोडच्या दिशेने पसार झाला. घटनेची माहिती मिळताच लोणार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर यांनी तातडीने पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना केले.सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन कौळासे, पोलीस उपनिरीक्षक राजेश घोगरे, लेखनिक गणेश लोंढे, पोलीस कॉन्स्टेबल अनिल शिंदे, गजानन डोईफोडे आणि चालक हरिभाऊ ढाकणे यांनी घटनास्थळी पाहणी केली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, चोरट्यांचा माग काढण्यासाठी परिसरात नाकाबंदीही करण्यात आली. मात्र, तोपर्यंत आरोपी दुचाकीवरून लोणी रोडने पसार झाले होते.
या प्रकरणी फिर्यादी दिलीप खरले यांच्या तक्रारीवरून लोणार पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ३४०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२), ३२४(२) नुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोनाली गर्जे करीत आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू असून, या धाडसी चोरीमुळे लोणार शहरातील व्यापारी वर्गातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.