ते बिनकामाचे मंत्री! पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या कामावर नाराज! प्रॉपर्टी कमवायची हाच त्यांचा धंदा!
रविकांत तुपकरांचा ना.प्रतापराव जाधवांवर हल्लाबोल! म्हणाले,

 जाधवांनी सांगाव.. किती शेतकऱ्यांचे कर्ज माफ होईल...
 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरसकट कर्जमुक्तीसाठी आज १५ जून पासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.बुलढाण्यातील त्यांच्या निवासस्थानासमोरच तुपकर अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत. या आंदोलनाला शेतकऱ्यांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. दरम्यान रविकांत तुपकर यांनी आंदोलनस्थळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्यासंदर्भात विचारलेल्या एका प्रश्नावर तुपकर यांनी तुफान हल्लाबोल चढवला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील सर्वात निष्क्रिय मंत्री प्रतापराव जाधव आहेत. त्यांच्या कामाबद्दल नरेंद्र मोदी नाराज असल्याची माहिती असल्याचे तुपकर म्हणाले...

आंदोलनस्थळी पत्रकारांशी संवाद साधत असताना पत्रकारांनी प्रतापराव जाधव यांच्यासंदर्भात प्रश्न विचारला होता. दोन दिवसांपूर्वी झालेल्या ना.जाधव यांच्या एका पत्रकार परिषदेत रविकांत तुपकर यांनी कर्जमाफी योजनेच्या जीआरची होळी केल्याचे जाधव यांना सांगत पत्रकारांनी त्यावर प्रतिक्रिया विचारली होती. त्यावेळी ना.जाधव यांनी कर्जमाफीच्या प्रश्नाला बगल दिली होती. ही बाब आज पत्रकारांनी रविकांत तुपकर यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर तुपकर म्हणाले की, प्रतापराव जाधव हे नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील सर्वात निष्क्रिय मंत्री आहे.

ते बिनकामाचे मंत्री आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी त्यांना काही देणे घेणे नाही.. सत्ता मिळवायची, त्यातून पैसा मिळवायचा आणि करोडो रुपयांची प्रॉपर्टी कमवायची हाच प्रतापरावांचा धंदा आहे. ते केंद्रात राज्यमंत्री आहे, त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे जाऊन कर्जमाफीच्या अटी आणि शर्ती शिथिल करायला सांगायला पाहिजे. या कर्जमाफीच्या योजनेत राज्यातील, जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र होतात हे प्रतापरावांनी सांगायला पाहिजे असेही रविकांत तुपकर म्हणाले. माझ्या माहितीप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रतापरावांच्या कामगिरीवर नाराज आहेत असेही तुपकर शेवटी म्हणाले...