तुमच्या घरी 'हे' अधिकारी आले नाहीत... किंवा आले तरी भेट झाली नाही? मग मतदार यादीतून नाव गायब होऊ शकते! जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण देवरेंनी सांगितली "एसआयआर" प्रक्रिया..
मतदार याद्या अधिक अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त करण्याच्या उद्देशाने बीएलओ प्रत्येक घराला भेट देऊन नाव, पत्ता, वय आणि इतर तपशीलांची खातरजमा करतील. माहितीमध्ये कोणताही बदल किंवा दुरुस्ती आवश्यक असल्यास त्यासाठी आवश्यक अर्ज जागेवरच भरून घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानंतर संबंधित अर्जावर कुटुंबप्रमुखाची स्वाक्षरी घेत प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. पहिल्या भेटीदरम्यान घरातील सदस्य उपलब्ध नसल्यास बीएलओ पुन्हा दुसऱ्यांदा आणि गरज भासल्यास तिसऱ्यांदा भेट देतील. मात्र या तीन भेटींपैकी किमान एका भेटीत कुटुंबातील जबाबदार सदस्य किंवा कुटुंबप्रमुख उपस्थित राहून माहितीची खातरजमा करणे आवश्यक आहे.
मतदारांना अर्ज भरणे किंवा आवश्यक कागदपत्रांबाबत कोणतीही अडचण आल्यास बीएलओ मार्गदर्शन करतील. तसेच बूथ लेव्हल एजंट (बीएलए) आणि स्थानिक लोकप्रतिनिधीही या मोहिमेत नागरिकांना सहकार्य करणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमानुसार ५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत नागरिकांना दावे आणि हरकती दाखल करण्याची संधी मिळणार आहे. यादीत नाव नसल्यास किंवा नाव, पत्ता अथवा इतर तपशीलात दुरुस्ती आवश्यक असल्यास अर्ज क्रमांक ६, ७ किंवा ८ भरून संबंधित दावा अथवा हरकत नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे."लोकशाहीची खरी ताकद प्रत्येक पात्र नागरिकाच्या मतदानाच्या हक्कात आहे. त्यामुळे बीएलओ आपल्या घरी भेट देतील तेव्हा त्यांना आवश्यक माहिती आणि कागदपत्रे उपलब्ध करून देत या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवा," असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी जिल्ह्यातील मतदारांना केले आहे.