“घशात जखम आहे, आवाज बसलाय, रोज दोन तासही झोप मिळत नाही; पण शेतकऱ्यांसाठी लढतोय!”
रविकांत तुपकरांचे सावखेड तेजनच्या सभेत भावनिक उद्गार; दुष्काळ संघर्ष यात्रेचा बारावा दिवसही गाजला; “आमच्यासाठी नव्हे, स्वतःच्या हक्कांसाठी ४ डिसेंबरला बुलढाण्यात या!”
बुधवारी, २५ नोव्हेंबर रोजी दुष्काळ संघर्ष यात्रेच्या बाराव्या दिवसाचा दौरा सिंदखेडराजा तालुक्यात झाला. पळसखेड चक्का, हनवतखेड, वाघोरा, महारखेड, सुलजगाव, चिंचोली, शेलू (भोसा), धांदरवाडी, दत्तापूर, वसंतनगर, डावरगाव, नाईकनगर, आंचली, नशिराबाद, शिवनी टाका या गावांमधून मार्गक्रमण करत यात्रेची सांगता सावखेड तेजन येथील दुष्काळ एल्गार सभेने झाली. दिवसभर गावोगावी शेतकरी, शेतमजूर, भूमिहीन, महिला आणि तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यात्रेला मिळाला. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या यात्रेत तुपकर सातत्याने शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. सावखेड तेजन येथील रात्रीच्या सभेलाही शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. सातत्याने सभा घेतल्याने आवाज बसला असतानाही तुपकर यांनी शेतकऱ्यांसमोर आपली भूमिका मांडली.
यावेळी तुपकर यांनी सोयाबीनच्या उत्पादन खर्चाचे आर्थिक गणित शेतकऱ्यांसमोर मांडले. मागील वर्षी एक क्विंटल सोयाबीनचा उत्पादन खर्च साडेसात हजार रुपये होता, मात्र बाजारात चार हजार रुपयांचा भाव मिळाला. यंदा उत्पादन खर्च १० हजार ६०० रुपयांवर पोहोचला असून साडेसात हजार रुपयांचा भाव मिळाला तरी शेतकऱ्याला प्रतिक्विंटल तीन हजार १०० रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. एका एकरातील सोयाबीनचा उत्पादन खर्च जवळपास ४० हजार रुपये, तर हेक्टरी खर्च एक लाख रुपयांच्या आसपास असल्याचे त्यांनी सांगितले. “हेक्टरी एक लाख रुपयांची मागणी आम्ही मनाला वाटेल म्हणून केलेली नाही. त्यामागे उत्पादन खर्चाचा संपूर्ण हिशोब आहे. आम्हाला नफा देऊ नका, पण शेतात जेवढे पैसे लावले, तेवढे तरी परत द्या,” अशी भूमिका तुपकर यांनी मांडली. सरकारने दिलेली पाच हजार रुपयांची मदत मान्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय रखडलेला पिक विमा, सरसकट कर्जमाफी, भूमिहीन,मजुरांच्या १ लाख मदतीच्या मुद्यांवर देखील तुपकरांनी भाष्य केले
गेल्या २२ वर्षांपासून शेतकरी चळवळीत काम करत असून या संघर्षातून आपल्यावर शंभर ते दीडशे गुन्हे दाखल झाल्याचे तुपकर यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, मात्र त्यातून माघार घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “हा कोणत्याही राजकीय पक्षाचा मोर्चा नाही. हा शेतकरी, शेतमजूर, भूमिहीन, विद्यार्थी आणि महिलांचा, संपूर्ण गावगाड्याचा मोर्चा आहे. आम्ही केवळ निमित्तमात्र आहोत. कुणीतरी पुढाकार घ्यायला हवा म्हणून आम्ही तो घेतलाय. आम्हाला खूश करण्यासाठी मोर्चाला येऊ नका, स्वतःच्या प्रश्नांसाठी या,” असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, १४ नोव्हेंबर रोजी मलकापूर येथून सुरू झालेल्या दुष्काळ संघर्ष यात्रेला बारा दिवस पूर्ण झाले आहेत. दररोज पंधरा ते वीस सभा, अपुरी झोप, घशाचा त्रास, त्यातही शेतकऱ्यांच्या अडचणी ऐकून संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून त्या मार्गी लावण्याचा प्रयत्न, असा तुपकरांचा दिनक्रम सुरू आहे. शरीर थकत असले तरी संघर्ष थांबलेला नाही. दुसरीकडे, गावोगावी यात्रेला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता ४ डिसेंबर रोजी बुलढाण्यात होणाऱ्या दुष्काळ एल्गार महामोर्चाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हेक्टरी एक लाख रुपयांची नुकसानभरपाई, सरसकट कर्जमाफी आणि हक्काचा पीकविमा यांसह विविध मागण्यांसाठी बुलढाण्यात शेतकऱ्यांची मोठी एकजूट उभी करण्याची तयारी सुरू आहे.