जिल्ह्यात इंधनाची टंचाई नाही; अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई – जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील; साठेबाजी रोखण्यासाठी प्रशासनाची विशेष पथके तैनात...

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : आखाती प्रदेशात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसची टंचाई निर्माण झाल्याच्या अफवा काही असामाजिक घटकांकडून पसरवल्या जात आहेत. मात्र बुलढाणा जिल्ह्यात इंधनाचा कोणताही तुटवडा नसून नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे स्पष्ट आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
प्रशासनाकडे काही ठिकाणी घरगुती गॅसची बेकायदेशीर साठवणूक केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या प्रकाराला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष पथके स्थापन केली असून जिल्हा प्रशासन व पोलीस विभागाच्या संयुक्त कारवाईतून साठेबाजी करणाऱ्यांवर तसेच अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
दरम्यान, इंधन कंपन्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसचा पुरवठा नियमितपणे सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊन अनावश्यक खरेदी किंवा साठेबाजी करू नये, तर गरजेनुसारच इंधन खरेदी करावे, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.
इंधन पुरवठ्याबाबत कोणतीही तक्रार असल्यास किंवा कुठे साठेबाजी अथवा काळाबाजार होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी बुलढाणा येथील नैसर्गिक आपत्ती कक्षाशी किंवा दूरध्वनी क्रमांक ०७२६२-२४२६८३ वर तात्काळ संपर्क साधावा, असेही जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.