“मुलीच होतात, मुलगा का होत नाही?” विवाहितेचा सासरी छळ; दुचाकीसाठी २ लाख, नंतर ५ लाखांची मागणी! पतीने दुसरे लग्नही केले; मारहाण करून पत्नीला घराबाहेर काढले, पतीसह १० जणांवर गुन्हा...

 
 सिंदखेडराजा (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : मुलगा होत नाही म्हणून विवाहितेचा छळ... त्यातच माहेरून दुचाकी खरेदीसाठी दोन लाख रुपये आणण्याचा तगादा... पैसे न आणल्याने मारहाण करून घराबाहेर काढले... एवढ्यावरच न थांबता पुन्हा पाच लाख रुपयांची मागणी करीत पैसे आणल्याशिवाय घरात प्रवेश देणार नाही, अशी धमकी! सिंदखेडराजा तालुक्यातील पळसखेड (म) येथील एका विवाहितेने सासरच्या मंडळींवर केलेल्या गंभीर आरोपांमुळे कौटुंबिक छळाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, मुलगा होत नसल्याच्या कारणावरून छळ करणाऱ्या पतीने दुसरे लग्न केल्याचाही आरोप विवाहितेने केला आहे. याप्रकरणी पती आणि त्याच्या दुसऱ्या पत्नीसह तब्बल दहा जणांविरुद्ध सिंदखेडराजा पोलिस ठाण्यात १८ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पळसखेड (म) येथील चंद्रकला गणेश शिंदे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नानंतर त्यांना मुली झाल्या. मात्र, मुलगा होत नसल्याच्या कारणावरून सासरच्या मंडळींकडून त्यांचा वारंवार शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात येत होता. पती गणेश शिंदे यांच्याकडूनही याच कारणावरून त्रास दिला जात असल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यातच पतीने दुसरे लग्न केल्याचाही आरोप चंद्रकला यांनी केला आहे.

दुसरीकडे दुचाकी खरेदीसाठी माहेरून दोन लाख रुपये आणण्याची मागणी करण्यात आली. ही रक्कम न आणल्याने विवाहितेला मारहाण करून घराबाहेर काढण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतरही पैशांचा तगादा थांबला नाही. उलट पुन्हा पाच लाख रुपये आणण्याची मागणी करण्यात आली. पैसे आणल्याशिवाय घरात प्रवेश मिळणार नाही, अशी धमकी दिल्याचाही आरोप आहे. अखेर सततच्या छळाला कंटाळून चंद्रकला यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून पती गणेश शिंदे, दुसरी पत्नी संगीता शिंदे यांच्यासह अन्य आठ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ११५(२), ३(५), ३५१(२), ३५२ आणि ८५ अन्वये सिंदखेडराजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आरोपांची पुढील चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे.