गावच्या सुपुत्राचा गावकऱ्यांनी केला गौरव! "एमपीएससी" तून अधिकारी झालेल्या रविंद्रची अंचरवाडीवासीयांनी मिरवणूक काढली;गुलाल उधळला...

 
 अंचरवाडी(अनंता काशीकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): प्रचंड संघर्षातून यश अपयशाचे चटके सोसत अखेर तो अधिकारी झालाच.. एमपीएससी ची राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन तो जेव्हा जन्मभूमी असलेल्या अंचरवाडीत दाखल झाला तेव्हा अख्ख्या गावाने त्याला अक्षरशः डोक्यावर घेतले..कुणी गुलाल उधळत होतं..कुणी फटाके फोडत होतं तर कुणी आनंदाच्या भरात तल्लीन होऊन नाचत होतं..कुणी त्याच्यासोबत सेल्फी काढत होत, कुणी हस्तांदोलन करून, गळाभेट करून शुभेच्छा देतं होत.. कारणं हा सोहळा होता गावच्या भूमिपुत्राचा..ज्याच बालपण, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण यांचं मातीत झालं तो रवींद्र आता अधिकारी बनून आपल्या गावात आला होता ..

रवींद्र पंजाबराव परिहार याने नुकत्याच झालेल्या एमपीएसीच्या राज्यसेवा परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. मात्र हे यश मिळवताना त्याला प्रचंड संघर्ष करावा लागला, अनेकदा अपयशही पचवावे लागले. मात्र प्रयत्नांमधील सातत्याने त्याला यश मिळालेच. काल,२९ डिसेंबरच्या सायंकाळी तो पहिल्यांदा गावात आला तेव्हा कुटुंबीयांसह गावकऱ्यांनी त्यांच जंगी स्वागत केलं. फटाके फोडत गुलाल उधळत त्यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली.यावेळी कुटुंबीयांच्या डोळ्यातही आनंदाश्रू तरळले होते. "घरच्यांच्या पाठबळामुळे, अपयशातही खंबीर साथ दिल्यामुळेच मी हे यश मिळवू शकलो. सामान्य कुटुंबात असल्याने जनसामान्यांच्या समस्या जीवन जगताना अनुभवल्या आहेत, त्यामुळे आता यापुढचे आयुष्य अधिकारी म्हणून समाजासाठीच अर्पित करायचे आहे" अशी भावनिक प्रतिक्रिया यावेळी रविंद्रने दिली.