राज्यातील नोंदणीकृत सुरक्षा रक्षकांचा गणवेश आता खाकी रंगात; 1 मेपासून अंमलबजावणी – कामगार मंत्री ॲड. फुंडकर यांची माहिती

 
 
मुंबई (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) – महाराष्ट्र राज्यातील नोंदणीकृत सुरक्षा रक्षकांसाठी खाकी रंगाच्या गणवेशास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. 1 मे 2025 पासून कामगार दिनाचे औचित्य साधून राज्यभरात हा नवा गणवेश अंमलात येणार आहे, अशी माहिती कामगार मंत्री ॲड. फुंडकर यांनी दिली आहे.
नव्या गणवेशात खाकी रंगाचा शर्ट व पॅंट तसेच निळ्या रंगाची टोपी असेल. टोपीवर सुरक्षा रक्षक मंडळाचा लोगो व नाव असणार आहे. या गणवेशाचे अनावरण नरीमन भवन, मुंबई येथे ॲड. फुंडकर यांच्या हस्ते करण्यात आले.
सुरक्षा रक्षक संघटनांनी खाकी गणवेशाची मागणी शासनाकडे केली होती, ज्यास कामगार मंत्र्यांनी मान्यता दिली आहे. सध्या राज्यात जिल्हानिहाय 16 सुरक्षा रक्षक मंडळे कार्यरत आहेत. या निर्णयामुळे राज्यातील सर्व सुरक्षा रक्षकांचा गणवेश एकसमान होणार असून, ओळख, शिस्तबद्धता आणि व्यावसायिकतेत वाढ होणार असल्याचेही ॲड. फुंडकर यांनी स्पष्ट केले.
जागरूक रहा
राज्याच्या सुरक्षाव्यवस्थेला सुसंगत व व्यावसायिक रूप देण्याच्या दृष्टीने ही महत्त्वाची पाऊले उचलण्यात आली असून, सुरक्षा रक्षकांच्या सन्मानातही यातून वाढ होणार आहे, असे कामगार मंत्री म्हणाले.