समृध्दी महामार्गावर ट्रक थांबवला,मागून आलेल्या आयशरने उडवला! एकाचा जागीच मृत्यू! डोणगाव पोलीस स्टेशन हद्दीत रात्री झाला अपघात
Sep 27, 2023, 09:46 IST
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यातून जाणाऱ्या समृध्दी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. मंगळवारच्या रात्री देखील समृध्दी महामार्गावर भीषण अपघात झाला,यात एकाचा जागीच मृत्यू झाला.
डोणगाव पोलीस स्टेशन च्या हद्दीतून जाणाऱ्या समृध्दी महामार्गावर हा अपघात झाला. महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या एका ट्रकला मागून येणाऱ्या दुसऱ्या ट्रकने धडक दिली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला. वीरेंद्र पांडे असे मृतकाचे नाव असून तो उत्तर प्रदेशातील राहणारा आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला.
प्राप्त माहितीनुसार वीरेंद्र पांडे याने त्याच्या ताब्यातील ट्रक समृध्दी महामार्गाच्या कडेला उभा केला.त्यानंतर तो ट्रकच्या मागच्या बाजूला उभा होता. तेवढ्यातच मागून आलेल्या आयशरने उडवल्याने जागीच चेंदामेंदा होऊन वीरेंद्र पांडेंचा मृत्यू झाला. याच अपघातात मागून आलेल्या आयशर चा चालक देखील जखमी झाला आहे.