देवाच्या मंदिरालाही चोरट्यांनी सोडले नाही! संग्रामपूर शिवारात कुलूप तोडून डल्ला; चांदीचे डोळे, पितळी साहित्य अन् दानपेटीतील रोकड लंपास...
मिळालेल्या माहितीनुसार, सुनील अंबादास राजनकार यांच्या शेतात लोकवर्गणीतून श्री आनंदेश्वरी दुर्गामातेचे मंदिर बांधण्यात आले आहे. मंदिराची देखभाल तसेच दैनंदिन आरतीची जबाबदारी राजनकार यांच्या आई-वडिलांकडे आहे. मंदिराच्या लोखंडी दरवाजाला कुलूप लावण्यात आले होते.
१९ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सुनील राजनकार शेतात गेले असता मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. आत जाऊन पाहणी केली असता दोन जुन्या पितळी समई, चार पितळी वस्तू, सुमारे पाच ग्रॅम वजनाचे चांदीचे डोळे तसेच लोखंडी दानपेटी गायब असल्याचे आढळले. दानपेटीत अंदाजे दोन हजार रुपयांची रोकड होती.
चोरीचा प्रकार लक्षात येताच राजनकार यांनी मंदिर परिसर आणि आजूबाजूच्या शेतशिवारात चोरीस गेलेल्या साहित्याचा शोध घेतला. मात्र, कोणताही मुद्देमाल हाती लागला नाही.यानंतर सुनील अंबादास राजनकार यांनी तामगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.