जप्त केलेली जेसीबी चक्क तहसीलच्या आवारातूनच पळविली; तहसीलदारांनी पाठलाग करून केली पुन्हा जप्त...
Nov 21, 2025, 16:07 IST
सिंदखेडराजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : बेकायदेशीर रेती उत्खननाच्या
संशयावरून जप्त करून सिंदखेडराजा तहसील कार्यालयाच्या आवारात सुरक्षित उभी करून ठेवलेली बिना नंबरची जेसीबी मशीन दोन आरोपींनी संगनमत लंपास केल्याची घटना 20 नोव्हेंबर रोजी उघडकीस आली.दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सिंदखेड राजाचे तहसीलदार अजित दिवटे यांनी पोलिसांच्या मदतीने जेसीबीचा पाठलाग करून जप्त केली. तहसीलच्या आवारातूनच जेसीबी लंपास करण्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.
ताडशिवनी गावात बेकायदेशीर रेती (वाळू) उत्खनन
करण्याच्या उद्देशाने वापरली जात असल्याची संशयावरून, तहसील कार्यालयाच्या पथकाने विना क्रमांकाची जेसीबी मशीन ताब्यात घेतली होती. पुढील कायदेशीर कारवाई होईपर्यंत ही जेसीबी तहसील कार्यालयाच्या आवारात उभे करण्यात आले होते. गुरुवार, २० नोव्हेंबर रोजी सकाळी ११:३० वाजता तहसील कार्यालय सिंदखेडराजाच्या आवारातून आरोपीने जेसीबी पळून घेऊन निघाला असताना तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याला कळाले.
या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार अजित दिवटे व पोलीस उपनिरीक्षक बालाजी सानप यांनी पाठलाग करून मेहकर रोड जिजामाता पेट्रोल पंपानजीक जेसीबीसह जेसीपी चालकास पकडले. तहसील कार्यालयाचे शिपाई अनंता विठोबा वाठोरे वय 40 यांनी या प्रकरणी सिंदखेडराजा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यांच्या तक्रारीनुसार, २ आरोपींनी संगनमत करून जेसीबी चोरून नेली . समाधान नारायण मोरे, शुशिल प्रभाकर शिंदे रा. ताडशिवनी या आरोपीनी पूर्वनियोजित कटरचून, जप्त केलेली शासकीय मालमत्ता चोरून नेण्याच्या उद्देशाने पळवल्याचे फिर्यादीत नमूद आहे. फिर्यादीनंतर सिंदखेडराजा पोलीस ठाण्यात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला.या गंभीर प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक बालाजी सानप यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.