शेतकऱ्यांच्या क्रांतिकारी राजाचे बुलढाण्यात थाटात आगमन!डफड्यांच्या तालावर रविकांत तुपकरांनी धरला ठेका; तुपकरांची दत्तक कन्या श्रेयाने केली श्रीगणरायाची विधिवत पूजा;

श्रेयाच्या हातून स्थापना, एल्गार मोर्चाचा देखावा ठरतोय आकर्षण...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):संपूर्ण देशभरात आज गणरायाचे धुमधडाक्यात आगमन झाले. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे जनसंपर्क कार्यालय असलेल्या क्रांतिकारी हेल्पलाइन सेंटर येथेही शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या क्रांतिकारी राजाचे थाटात आगमन झाले. ढोल ताशांचा गजर,डफड्यांचा ताल, फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची मुक्त उधळण अशा उत्साह पूर्ण वातावरणात चिखली रोडवर, त्रिशरण चौकानजीक क्रांतिकारी राजाची मिरवणूक निघाली. या मिरवणुकीत रविकांत तुपकरांनी ढोल ताशांच्या व डफड्यांच्या तालावर ठेका धरला, त्यांच्यासमवेत मोठ्या संख्येने तरुण मिरवणुकीत थिरकतांना दिसलें.रविकांत तुपकर व पत्नी शर्वरी तुपकरांनी भर रस्त्यावर फुगडी खेळून सर्वांचे लक्ष वेधले..!

 बुलढाणा शहरातील चिखली रोडवरील महावितरण कार्यालयापासून क्रांतिकारी राजाचा भव्य आगमन सोहळा सुरू झाला. रविकांत तुपकर यांच्यासह अनेक शेतकरी कष्टकरी या सोहळ्यात सहभागी झाले. मिरवणूक क्रांतिकारी हेल्पलाइन सेंटर जवळ आल्यानंतर रविकांत तुपकर यांची दत्तक कन्या श्रेया हिच्या हस्ते श्री. गणरायांचे विधिवत पूजन करून स्थापना करण्यात आली.

कष्टकऱ्यांचे विघ्न दूर कर; रविकांत तूपकरांची क्रांतिकारी राजाकडे मागणी..

राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शेतमालाला भाव नाही, शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्ज मिळत नाही..मिळालेले कर्ज फेडण्यासाठी बँका शेतकऱ्यांकडे तगादा लावतात, मात्र शेतकऱ्यांनी कर्ज फेडायचे कसे? या विवंचनेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. त्यामुळे सरकारला कर्जमुक्ती करण्याची, सोयाबीन कापसाला भाव देण्याची सदबुद्धी दे आणि शेतकऱ्यांवरील विघ्न दूर कर अशी प्रार्थना रविकांत तुपकर यांनी श्री. गणरायाकडे केल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. शेतकऱ्यांना संकटाचा सामना करण्याचे बळ, आणि लढायला ताकद मिळो अशीही प्रार्थना गणराया चरणी केली. शहरातील नागरिकही मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

एल्गार मोर्चा चा देखावा ठरतोय आकर्षण..

  क्रांतिकारी राजा श्री गणरायासमोर ॲड. शर्वरी तुपकर यांच्या संकल्पनेतून मांडण्यात आलेला देखावा आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. बैलगाडीवर उभे राहून आसूड उभारणारे रविकांत तुपकर, त्यांच्या दिमतीला असलेला शेतकरी कष्टकऱ्यांचा,फौजफाटा, पोलिसांचा बंदोबस्त असा एकंदरीत शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठीच्या एल्गार मोर्चाचा देखावा क्रांतिकारी राजासमोर हुबेहूब थाटण्यात आला आहे.हा देखावा सगळ्यांना आकर्षित करतोय.