नाविन्यपूर्ण विकासाचा ध्यास क्षणोक्षणी, आ.गायकवाड बुलढाण्याला चढवणार हिरवाईचा मुकुटमणी! मिशन ग्रीन बुलढाण्याचा शुभारंभ...

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : थंड हवेचे ठिकाण म्हणून बुलडाणा शहर प्रसिद्ध होते. मात्र गेल्या काळात इतरत्र जाणवणारा उन्हाळा शहरातही जाणवायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे माझी वसुंधरा अभियानात शहरात वृक्ष लागवड मोहीम हाती घेण्यात येत आहे. यासाठी मिशन ग्रीन बुलडाणा राबविण्यात येत आहे. या मिशनच्या माध्यमातून शहराला गतवैभव प्राप्त करून देण्यात येणार असल्याची माहिती आमदार संजय गायकवाड यांनी दिली.
मिशन ग्रीन बुलडाणाचा शुभारंभ आज करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, उपविभागीय अधिकारी शरद पाटील, मुख्याधिकारी गणेश पांडे, कार्यकारी अभियंता सुभाष राऊत, जिल्हा प्रशासन अधिकारी श्री. पेंटे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे, जिल्हा कोषागार अधिकारी ऋषिकेश वाघमारे आदी उपस्थित होते.
आ. गायकवाड म्हणाले, देशात चंदीगड, इंदौर यासारखी प्रगत शहरे आहेत. याठिकाणी नियोजनबद्ध विकास करताना झाडेही लावण्यात आली आहे. त्यामुळे शहराच्या वैभवात भर पडली आहे. बुलडाणा शहराचा विकास करताना शहर अतिक्रमण मुक्त करावे. त्यासोबतच विकासात्मक कामे करताना शहरातील हिरवळ वाढविण्यासाठी झाडांचे संवर्धन करावे. शहरातील 65 भूखंडांवर विविध प्रजातींची झाडे लागवण्यात येणार आहे. ही झाडे जगविण्यासाठी दोन वर्षे पाणी आणि संरक्षणाची काळजी घेतली जाणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ. पाटील म्हणाले, शहरातील झाडे लावण्याच्या कामाचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. इतर ठिकाणी शहरात झाडे लागवड करण्यात येतात, त्याचप्रमाणे शहरात झाडांची लागवड व्हावी. शहरातील हिरवळ टिकून राहण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने एक झाड लावून ते दत्तक घ्यावे. यावर्षी प्रशासनामार्फत पाच लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यात सर्व घटकांना सामावून घेतले जाणार आहे.
कार्यक्रमाच्या सुरवातीला उपस्थितांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. आमदार गायकवाड यांनी झाडांविषयी माहिती दिली. तसेच वृक्ष लागवडीचे नियोजन सांगितले.