वैरागडच्या सोपान काळेला उसने पैसे देणाऱ्याची झाली फजिती! वाचा काय आहे मॅटर....

 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील वैरागड येथील ४० वर्षीय सुरेश सीताराम चिंचोले यांनी एकाला पैसे उसने देणे चांगलेच महागात पडले. पैसे घेतले तर घेतले वरतून पैसे मागितले म्हणून बेदम मारहाण केली..एवढी की ज्याला पैसे उसने दिले त्याच्या भीतीपोटी सुरेश चिचोले गावात देखील गेले नाहीत.. अमडापूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी त्यांनी तक्रार दिली आहे.
तक्रारदार सुरेश चिचोले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी गावातील सोपान जनार्धन काळे याला उसने पैसे दिले होते. गेल्या महिन्यात ११ तारखेला सोपान काळे घरासमोरून जात असताना तक्रारदार चिचोले यांनी त्याला उसने दिलेले पैसे मागितले. त्यावेळी" माझेकडे पैसे नाही" असे म्हणत काळे याने शिवीगाळ सुरू केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
 एवढ्यावर सोपान काळे थांबला नाही, त्याने चिचोले यांना चापट्या बुक्क्यांनी मारहाण केली. अंगणात पडलेली काडी उचलून उजव्या हातावर, डोक्यावर मारली.." यापुढे पुन्हा पैसे मागितले तर जीवाने मारून टाकीन" अशी धमकीही काळे याने दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. घटनेनंतर चिचोले तक्रार द्यायला पोलीस ठाण्यात गेले तेव्हा त्यांना पोलिसांनी उपचारासाठी पाठवले. 
बुलडाण्यात उपचार झाल्यावर चिचोले सोपान काळे याच्या भीतीने गावात गेले नाहीत. दरम्यानच्या काळात सोपान काळे यानेही अमडापुर पोलीस ठाण्यात सुरेश चिचोले याच्याविरोधात तक्रार दिली, तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्याने पोलिसांनी सुरेश चिचोले यांना कोर्टासमोर हजर केले. कोर्टाने त्यांची कारागृहात रवानगी केली. कारागृहातून सुटल्यावर सुरेश चिचोले यांनी अमडापुर पोलिस ठाण्यात तक्रार दिली . आता याप्रकरणात सोपान काळे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.