बुलढाण्यातील बंजारा समाजाची अनेक वर्षांची मागणी अखेर पूर्ण! आमदार संजय गायकवाडांच्या पाठपुराव्याला यश; पोहरादेवीसाठी थेट एसटी बससेवा सुरू, लोकार्पण सोहळ्यात समाजबांधवांकडून भव्य सत्कार....

 

 

बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरादेवी तीर्थक्षेत्री जाणाऱ्या भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. बुलढाणा शहरातून संत श्री सेवालाल महाराज यांच्या पवित्र तीर्थक्षेत्र पोहरादेवीपर्यंत थेट एसटी बससेवा सुरू करण्याची बंजारा समाजबांधवांची अनेक दिवसांपासूनची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, शुक्रवार, २५ सप्टेंबर रोजी बुलढाणा आगारातून या नवीन बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. या सुविधेमुळे भाविकांना मोठा दिलासा मिळणार असून, बससेवेच्या लोकार्पणप्रसंगी समाजबांधवांनी आमदार संजुभाऊ गायकवाड यांचा पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

पोहरादेवी हे बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत श्री सेवालाल महाराज यांचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी दर्शनासाठी बुलढाणा जिल्ह्यासह परिसरातील हजारो भाविक जात असतात. मात्र, बुलढाणा शहरातून थेट बससेवा उपलब्ध नसल्याने भाविकांना प्रवासादरम्यान अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. ही अडचण लक्षात घेऊन बुलढाणा ते पोहरादेवी थेट एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी समाजबांधवांकडून सातत्याने केली जात होती.या मागणीची दखल घेत आमदार संजय गायकवाड यांनी संबंधित यंत्रणेकडे पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांनंतर बुलढाणा आगारातून पोहरादेवीपर्यंत थेट बससेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता भाविकांना पोहरादेवीच्या दर्शनासाठी अधिक सोयीस्कर प्रवास करता येणार आहे.

डोंगरखंडाळा ते वाशिममार्गे पोहरादेवीपर्यंत धावणार एसटी!

बुलढाणा ते पोहरादेवी या नवीन बससेवेचा मार्ग डोंगरखंडाळा, उदयनगर, लाखनवाडा, बाळापूर, पातूर, मालेगाव, वाशिम आणि मानोरा मार्गे पोहरादेवी असा असणार आहे. या मार्गावरील प्रवाशांसह बंजारा समाजातील भाविकांना या बससेवेचा लाभ घेता येणार आहे.विशेषतः माता-भगिनी, ज्येष्ठ नागरिक, युवक आणि संत श्री सेवालाल महाराजांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी ही बससेवा महत्त्वाची ठरणार आहे.

शुक्रवार, २५ सप्टेंबर रोजी बुलढाणा आगारात आमदार संजय गायकवाड यांच्या शुभहस्ते नवीन एसटी बससेवेचा लोकार्पण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. समाजाच्या महत्त्वपूर्ण मागणीचा पाठपुरावा करून ती प्रत्यक्षात आणल्याबद्दल बंजारा समाजबांधवांच्या वतीने आमदार गायकवाड यांचा पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी समाजबांधवांनी समाधान व्यक्त करत आमदार संजुभाऊ गायकवाड यांचे आभार मानले.

 'पोहरादेवीला जाणे आता सोयीचे होणार'; समाजबांधवांनी व्यक्त केला आनंद!

बंजारा समाजबांधवांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, पोहरादेवी हे आमच्या समाजाचे श्रद्धास्थान असून, बुलढाण्यातून थेट बससेवा सुरू होणे ही अत्यंत आनंदाची बाब आहे. आमच्या मागणीची दखल घेऊन आमदार संजय गायकवाड यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे आज ही बससेवा प्रत्यक्ष सुरू झाली असून, समाजातील भाविकांना त्याचा मोठा लाभ होणार आहे.पोहरादेवीला जाणाऱ्या माता-भगिनी, ज्येष्ठ नागरिक, युवक आणि भाविकांसाठी ही बससेवा अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचेही समाजबांधवांनी नमूद केले.

 मान्यवरांची उपस्थिती

या लोकार्पण सोहळ्याला बंजारा समाजाचे धर्मगुरू श्री मांगीलाल महाराज, श्री संजयजी राठोड, आगार व्यवस्थापकांचे नियंत्रक श्री पवार साहेब यांच्यासह बंजारा समाजातील मान्यवर, समाजबांधव, नागरिक, माता-भगिनी तसेच शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.बुलढाणा ते पोहरादेवी थेट एसटी बससेवा सुरू झाल्याने बंजारा समाजाच्या भाविकांची अनेक दिवसांची मागणी पूर्ण झाली असून, संत श्री सेवालाल महाराजांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना आता प्रवासाची मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे.