दुष्काळाच्या सावटात आदिवासींच्या झोपड्यांत उजळले माणुसकीचे दिवे! शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंतांनी सातपुड्याच्या कुशीत साजरी केली दिवाळी; वस्त्रदान, फराळ अन् स्नेहभोजनाने फुलवला आनंद!

 भारावलेल्या लिंगा बाबांच्या मुखातून उमटले, ‘जालिंधर भाऊ वाह रे छे!’; आदिवासी बांधवांचे प्रेम पाहून बुधवंतही झाले भावुक...

 
 जळगाव जामोद (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : दिवाळी म्हटली की डोळ्यांसमोर येते ती दिव्यांची रोषणाई, नवीन कपडे, फराळाचा गोडवा आणि आनंदाने उजळलेली घरे... मात्र सातपुड्याच्या दुर्गम डोंगररांगांमध्ये राहणाऱ्या आदिवासी बांधवांसाठी यंदाची दिवाळी दुष्काळाच्या सावटाखाली आली आहे. अशा परिस्थितीत आपल्या आनंदात या बांधवांनाही सहभागी करून घेण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यांनी पुन्हा एकदा माणुसकीचा हात पुढे केला. दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी आदिवासी वस्तीत जाऊन दिवाळी साजरी केली. नवीन वस्त्रे, फराळ, मिष्टान्न, फटाक्यांची आतषबाजी आणि स्नेहभोजनामुळे सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या छोट्याशा टापरीवर आनंदाचे वातावरण निर्माण झाले. विशेष म्हणजे, आदिवासी बांधवांनी व्यक्त केलेल्या प्रेमाने खुद्द जालिंधर बुधवंतही भावुक झाले.

जळगाव जामोद तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या कालुसिंग (लिंगा) टापरी येथे ४ नोव्हेंबर रोजी हा हृदयस्पर्शी उपक्रम पार पडला. शहरातील दिवाळीच्या झगमगाटापासून दूर असलेल्या या आदिवासी वस्तीत जालिंधर बुधवंत आपल्या सहकाऱ्यांसह पोहोचले. केवळ भेटवस्तूंचे वाटप करण्यापुरता हा कार्यक्रम मर्यादित नव्हता, तर आदिवासी बांधवांच्या सुखदुःखात सहभागी होत त्यांच्यासोबत दिवाळीचा आनंद वाटण्याचा हा प्रयत्न होता.
यावेळी वस्तीतील ज्येष्ठ नागरिकांसह माता-भगिनींना वस्त्रदान करण्यात आले. प्रत्येक कुटुंबाला दिवाळीचा फराळ आणि मिष्टान्न देण्यात आले. फटाक्यांच्या आतषबाजीने परिसरात उत्साह संचारला, तर सर्वांसोबत झालेल्या स्नेहभोजनाने आपुलकीचे नाते अधिक घट्ट झाले. दुष्काळाच्या चिंतेत असलेल्या आदिवासी कुटुंबांच्या चेहऱ्यावर या निमित्ताने आनंदाचे क्षण फुलले.

‘जालिंधर भाऊ वाह रे छे!’; लिंगा बाबांच्या शब्दांनी वातावरण भारावले!

या कार्यक्रमातील सर्वाधिक भावस्पर्शी क्षण ठरला तो टापरी प्रमुख लिंगा बाबा यांनी व्यक्त केलेल्या भावनांचा! आपल्या वस्तीत येऊन दिवाळीचा आनंद वाटणाऱ्या जालिंधर बुधवंत यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना लिंगा बाबा यांनी आपल्या बोलीभाषेत ‘जालिंधर भाऊ वाह रे छे!’ अशा शब्दांत त्यांचा गौरव केला. त्यांच्या या सहज, निरागस उद्गारांमधून आदिवासी बांधवांच्या मनातील आपुलकी व्यक्त झाली.

‘आदिवासी बांधवांच्या स्नेहाचा मी ऋणी झालो आहे!’ — जालिंधर बुधवंत

आदिवासी बांधवांनी केलेले स्वागत आणि व्यक्त केलेल्या प्रेमाने जालिंधर बुधवंतही भारावून गेले. ‘आदिवासी बांधवांच्या स्नेहाचा मी ऋणी झालो आहे,’ अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
जालिंधर बुधवंत दरवर्षी आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करण्याचा उपक्रम राबवतात. यंदा दुष्काळाची परिस्थिती असल्याने या उपक्रमाला विशेष भावनिक संदर्भ प्राप्त झाला. सणाचा आनंद केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तो गरजू आणि दुर्गम भागातील कुटुंबांसोबत वाटण्याची परंपरा त्यांनी यंदाही कायम ठेवली.

या प्रसंगी शिवसेना जिल्हा समन्वयक गजानन धांडे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. तळागाळातल्या सामान्य माणसासाठी काम करणे हाच शिवसेनेचा विचार आहे. हाच विचार घेऊन जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत आपले कर्तव्य बजावत असल्याचे गजानन धांडे म्हणाले.त्यांच्या मार्गदर्शनात काम करत असतांना शिवसेनेची बांधणी अधिक बळकट करणे आणि समाजाच्या शेवटच्या घटकासाठी शिवसेना काम करत असल्याचे ते म्हणाले.या प्रसंगी तालुकाप्रमुख विजय इतवारे, किसान सेना उपजिल्हाप्रमुख गजानन उबरहंडे, मुंढे मामा यांच्यासह आदिवासी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिवाळीचा खरा आनंद केवळ आपल्या घरात दिवे लावण्यात नसतो, तर दुसऱ्याच्या आयुष्यात आनंदाचे क्षण निर्माण करण्यातही असतो. सातपुड्याच्या दुर्गम आदिवासी वस्तीत जालिंधर बुधवंत यांनी साजरी केलेली ही दिवाळी त्याच माणुसकीच्या भावनेची आठवण करून देणारी ठरली.