गाय ठार करणारा बिबट्या विहिरीत तडफडून मेला; वनविभागाचे रेस्क्यू पथक वेळेत पोहचले नाही! पळशी बु. शिवारातील घटना; शेतकरी अनिल बोराळे यांच्या विहिरीत आढळला बिबट्या,

 हिंगणा उमऱ्यात गाय ठार केल्यानंतर पळताना विहिरीत पडल्याचा अंदाज...

 
 खामगाव (भागवत राऊत : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : हिंगणा उमरा येथे गोठ्यात घुसून गाय ठार करणारा प्राणी बिबट्याच असल्याचे अखेर स्पष्ट झाले आहे. मात्र, त्याच बिबट्याचा पळशी बु. शिवारातील एका विहिरीत पडून दुर्दैवी अंत झाला. शेतकऱ्यांनी वनविभागाला माहिती देऊनही रेस्क्यू पथक वेळेत घटनास्थळी पोहोचू शकले नाही. त्यामुळे विहिरीतील पाण्यात तडफडून बिबट्याचा मृत्यू झाल्याने वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.दोन दिवसांपूर्वी रात्री हिंगणा उमरा येथील शेतकरी मार्तंड रामकृष्ण जुमळे यांच्या गोठ्यात घुसून अज्ञात वन्यप्राण्याने साडेतीन वर्षांच्या गीर गायीवर हल्ला केला होता. या हल्ल्यात गायीचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर वनविभागाने घटनास्थळी पाहणी करत पाऊलखुणांच्या आधारे हा हल्ला बिबट्यानेच केल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यामुळे संभापूर, हिंगणा उमरा परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.दरम्यान, काल सकाळी पळशी बु. शिवारातील शेतकरी अनिल बोराळे यांच्या शेतातील विहिरीत बिबट्या पडल्याचे आढळून आले. हिंगणा उमरा येथील गायीची शिकार केल्यानंतर पळून जात असताना हा बिबट्या विहिरीत पडला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

बिबट्या विहिरीत पडल्याचे लक्षात येताच शेतकऱ्यांनी तातडीने वनविभागाला माहिती दिली. बिबट्याला वाचविण्यासाठी वनविभागाच्या रेस्क्यू पथकाची प्रतीक्षा सुरू होती. मात्र, पथक घटनास्थळी पोहोचेपर्यंत बिबट्याचा विहिरीतील पाण्यात तडफडून मृत्यू झाला होता.

हिंगणा उमरा येथे गाय ठार झाल्यानंतर परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली होती. त्यानंतर बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये काहीसा दिलासा निर्माण झाला होता. मात्र, बचावकार्य सुरू होण्यापूर्वीच बिबट्याचा मृत्यू झाल्याने या घटनेने आता वनविभागाच्या बचाव यंत्रणेच्या कार्यक्षमतेबाबत चर्चेला उधाण आले आहे.
वन्यप्राणी मानवी वस्त्यांच्या जवळ येण्याच्या घटना वाढत असताना अशा प्रसंगी वनविभागाने तातडीने रेस्क्यू पथक उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याची भावना शेतकरी आणि ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.