बिबट्या आला रे....! चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये दहशत; शेलगाव जहागीर, मुंगसरी, मकरध्वज खंडाळा शिवारात बिबट्या दिसल्याचा दावा; वनविभागाने बिबट्याला जेरबंद करावे– शेतकऱ्यांची मागणी..
Dec 14, 2024, 13:39 IST
चिखली(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सध्या रब्बी पिकांचा हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी रात्री अपरात्री शेतात जावे लागते.अशा परिस्थितीत आता चिखली तालुक्यातील शेलगाव जहांगीर, मकरध्वज खंडाळा, मुंगसरी येथील शेतकऱ्यांमध्ये कमालीची दहशत पसरली आहे. कारण या परिसरात बिबट्याने थैमान घातल्याचा दावा परिसरातील शेतकरी करीत आहेत. शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी देखील "मी माझ्या डोळ्याने बिबट्या पहिला" असा दावा केला आहे..
काल,१३ डिसेंबर रोजी सकाळपासून दोन ते तीन वेळेस बिबट्या दिसल्याचे शेलगाव देशमुख येथील शेतकऱ्यांनी सांगितले. सध्या शेतकऱ्यांना रब्बी पिकांना पाणी देण्यासाठी रात्री– बेरात्री शेतात जावे लागते. मात्र आता बिबट्या दिसल्याची चर्चा सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांमध्ये पसरलेली भीती दूर करण्यासाठी वनविभागाने तात्काळ बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे...