श्रीक्षेत्र माकोडीत ‘खोपडी बारस’ उत्सवाची भव्य महाप्रसादाने सांगता!
भगवंत करुणेचा दाता; नित्यनेमाने नामस्मरण करा – श्रीहरी महाराज;
एकादशीला वरुणराजानेही लावली हजेरी; भाविकांना कापड प्रसादाचे वितरण...
Updated: Nov 4, 2025, 13:47 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : देव हा भावाचा आणि भक्तीचा भुकेला आहे. नामस्मरणाची शक्ती अपार आहे. भगवंत हा करुणेचा दाता आहे. दररोज सकाळी पाच-दहा मिनिटे का होईना, पण देवाचे नाव नित्यनेमाने आणि कळकळीने घ्या, असे मार्गदर्शन समर्थ सद्गुरू श्री. श्रीहरी महाराज यांनी केले.
श्रीक्षेत्र माकोडी येथील चैतन्य मंदिर परिसरात आयोजित तीन दिवसीय खोपडी बारस सोहळ्याची सांगता ३ नोव्हेंबर रोजी भव्य महाप्रसादाने करण्यात आली. या प्रसंगी श्रीहरी महाराज भाविकांना मार्गदर्शन करताना बोलत होते. त्यांनी स्वतःच्या हस्ते भाविकांना कापड प्रसादाचे वितरण केले.
ते पुढे म्हणाले की, नामस्मरणाच्या यज्ञाची पूर्णाहुती ही सद्गुरू आणि श्रीरामरायाच्या कृपेने यंदाही यशस्वीरीत्या पार पडली. “ढगफुटी-सदृश पाऊस झाला तरी यज्ञमंडप आणि पूजा विधी सुखरूप पार पडले, हीच प्रभू रामचंद्रांची कृपा आहे,” असेही ते म्हणाले. यावेळी ७१ कोटी रामनाम जपाची पूर्णाहुती श्रीहरी महाराज यांच्या हस्ते देण्यात आली.
प्रपंचात हित साधण्यासाठी आणि शाश्वत सुख, समाधानाचा मार्ग मिळवण्यासाठी प्रभू रामचंद्रांचे व भगवंताचे नामस्मरण आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. “घरदार आणि संसार सोडून तुम्ही प्रभू रामचंद्रांच्या व सद्गुरूंच्या आवडीने दिंडीत सहभागी होता, त्यामुळे तुमची काळजी स्वतः रामराया घेतात,” असेही त्यांनी नमूद केले.“भगवंतावर निष्ठा आणि भक्ती अढळ ठेवा,” असा संदेशही श्रीहरी महाराजांनी दिला.
तत्पूर्वी, १ नोव्हेंबर रोजी श्रीराम प्रभूच्या मूर्तीला अभिषेक करून काकडा आरतीने सोहळ्याची सुरुवात करण्यात आली.
सकाळी श्रीहरी महाराजांच्या हस्ते यज्ञकुंड प्रज्वलित करण्यात आले. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.२ नोव्हेंबरला सायंकाळी जळगाव जामोद व बारसला, तसेच टाकळी गवळी, लिहा आणि परिसरातील पायी दिंड्यांचे श्रीक्षेत्र माकोडी येथे आगमन झाले. एकादशीच्या दिवशी सायंकाळी बुलढाणा येथील ह.भ.प. गजानन गायकवाड यांचे सुश्राव्य कीर्तन पार पडले.
३ नोव्हेंबरला सकाळी रामनाम जपाची पूर्णाहुती दिल्यानंतर ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली निरपूरकर यांनी संत संगतीचा महिमा आपल्या कीर्तनातून सांगितला. यज्ञस्थळावरील मंडपाची केळीच्या पानांनी केलेली सजावट विशेष आकर्षण ठरली.
मलकापूरचे आमदार चैनसुख संचेती, उद्योजक विनोदसेठ मुंदडा आणि मलकापूर राम उपासक मंडळाने भाविकांच्या सोयीसाठी मलकापूर ते माकोडी या दरम्यान मोफत वाहन व्यवस्था उपलब्ध करून दिली होती. अकोला येथील ब्रह्मवृंदाने सोहळ्यासाठी मंत्रपठण केले.विदर्भ, मराठवाडा, खान्देश तसेच राज्यातील विविध भागांतून आलेल्या माकोडी भक्तांच्या उपस्थितीने चैतन्य मंदिर परिसर भक्तिरसाने फुलून गेला होता. दुपारी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला, तर सायंकाळी तुळशी विवाहाने सोहळ्याची सांगता झाली.