आषाढ सरींमध्ये रंगला "कर्मभूमी ते गुरुभूमी" पायीवारी सोहळा; रामनामाच्या गजरात भक्तिमय वातावरण, श्रीहरी महाराजांचा निरपेक्ष भक्तीचा संदेश...

 
 बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):आषाढ महिन्यात कोसळणाऱ्या पावसाच्या सरी, ओठांवर अखंड रामनामाचा जप आणि हृदयात सद्गुरूंच्या चरणी अढळ श्रद्धा... अशा भक्तिमय वातावरणात बुलढाणा ते श्रीक्षेत्र माकोडी दरम्यान आयोजित करण्यात आलेला "कर्मभूमी ते गुरुभूमी" पायीवारी सोहळा उत्साहात आणि आध्यात्मिक वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यात शेकडो भाविकांनी सहभागी होत रामनामाच्या गजरात गुरूभक्तीचा अनोखा अनुभव घेतला.रामनामाचा प्रचार आणि प्रसार हेच जीवनकार्य मानणारे समर्थ सद्गुरू श्रीहरी महाराज (श्रीक्षेत्र माकोडी)यांच्या वाढदिवसानिमित्त भाविकांच्या वतीने या पायीवारीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चैतन्य मंदिर परिसरात भाविकांना मार्गदर्शन करताना श्रीहरी महाराज म्हणाले, "ज्याप्रमाणे लहान मुलासाठी काय चांगले आणि काय वाईट याची काळजी आई-वडील घेतात, त्याचप्रमाणे साधकाच्या आध्यात्मिक प्रगतीची खरी चिंता सद्गुरू करत असतात. संतांनी अनुभवातून नामस्मरणाचा मार्ग दिला आहे. त्यामुळे कोणत्याही अपेक्षेशिवाय, निरपेक्ष भावनेने दररोज रामनाम घ्या."

२० जुलै रोजी सकाळी बुलढाणा शहरातील मलकापूर रोडवरील गणेशनगर येथील साईराम मंदिरातून पायीवारीला प्रारंभ झाला. राजूर मार्गे वाघजाळ फाटा, मोताळा येथे वारी दाखल झाली. मोताळा येथे श्री. दोडे कुटुंबीयांकडे सायंकाळची उपासना झाल्यानंतर सहकार मंदिराच्या सभागृहात वारकऱ्यांनी मुक्काम केला.

दुसऱ्या दिवशी, २१ जुलै रोजी डिडोळा फाटा-शेलापूर मार्गे वारीने श्रीक्षेत्र माकोडी गाठले. शेलापूर येथे श्री. आमटे यांच्या निवासस्थानी भोजनप्रसादानंतर अकोला, खामगाव आणि परिसरातून आलेल्या इतर पायी दिंड्याही या वारीत सहभागी झाल्या. मुसळधार पावसाच्या सरींमध्येही भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. रामनामाचा अखंड जयघोष, टाळ-मृदुंगाच्या निनादात रंगलेले भजन आणि सद्गुरूंच्या भेटीची ओढ यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिरसाने भारावून गेले होते.

आषाढ शुद्ध नवमी अर्थात २२ जुलै रोजी पहाटे काकड आरतीनंतर समर्थ सद्गुरू श्रीहरी महाराज यांचे मंगल स्नान व वैदिक मंत्रोच्चारात पाद्यपूजन करण्यात आले. जानेफळ येथील डॉ. सचिन दिवटे कुटुंबीय तसेच डोणगाव येथील श्री. आखाडे कुटुंबीय यांच्या वतीने श्रीहरी महाराजांची साखरतुला करण्यात आली.

यावेळी मार्गदर्शन करताना श्रीहरी महाराज म्हणाले, "ईश्वराच्या नामाचा ध्यास घ्या. रामनामामध्ये अशी अद्भुत शक्ती आहे की संत स्वतः तुम्हाला धुंडाळीत येतील. शुद्ध भावनेने आणि निरपेक्ष भक्तीने नामस्मरण केले तर भगवंताची कृपा निश्चित प्राप्त होते. देव आणि नाम हे वेगळे नसून एकच आहेत, हा दृढ विश्वास ठेवून प्रत्येकाने नित्यनेमाने रामनामाचा जप करावा."

महाप्रसादाने या दोन दिवसीय पायीवारी सोहळ्याची सांगता झाली. आषाढातील पावसाच्या साक्षीने पार पडलेल्या या वारीने भाविकांना केवळ गुरूंचे दर्शनच नव्हे, तर नामस्मरण, श्रद्धा आणि निरपेक्ष भक्तीचा अमूल्य आध्यात्मिक संदेश दिला.