बुलडाण्याचा गौरव! वुमन लीडर ऑफ दि इअर पुरस्काराने मालतीताई शेळके सन्मानित!
महिला सक्षमीकरण कार्याचा गौरव;उत्तरप्रदेशातील लखनौ येथे पार पडला एफसीबीएचा पुरस्कार वितरण सोहळा...
Oct 20, 2024, 17:59 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या भरीव कामगिरीबद्दल राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्या अध्यक्षा मालतीताई शेळके यांना एफसीबीएच्यावतीने सहकार क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या वुमन लीडर ऑफ दि इअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नवाबांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तरप्रदेशातील लखनौ येथे १९ ऑक्टोबर रोजी हा पुरस्कार वितरण समारंभ थाटात पार पडला.
संस्थापक अध्यक्ष संदीप शेळके यांच्या मार्गदर्शनात मालतीताई शेळके यांनी राजर्षी शाहू मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. ग्राहकांना दर्जेदार सेवा प्रदान करण्यासोबतच अत्याधुनिक तंत्रज्ञानावर त्यांनी भर दिला. महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना आणि राबवित असलेले सामाजिक उपक्रम यामुळे त्यांच्या नेतृत्वात संस्थेच्या यशाचा आलेख सतत चढता राहिला आहे. संस्था कितीही मोठी असली तरी सुद्धा एक महिला सक्षमपणे कारभार सांभाळू शकते याचा आदर्श मालतीताई शेळके यांनी उभा केला. त्यांच्या कार्याची दखल घेऊन सहकार क्षेत्रातील अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. विशेष म्हणजे गतवर्षी एफसीबीए अंतर्गत राजर्षी शाहू मल्टिस्टेटला बेस्ट मोबाईल एप पुरस्कार मिळाला होता.
राजर्षी शाहू परिवाराचे आधारवड भाऊसाहेब शेळके यांचे पाठबळ तसेच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची खंबीर साथ असल्यामुळे आपण संस्थेचा कारभार यशस्वीपणे सांभाळू शकतो. सर्व सहकाऱ्यांचे सहकार्य सुद्धा लाभते. त्यामुळे दैनंदिन कामकाज सोयीचे होते. वुमन लीडर ऑफ दि इअर पुरस्कार मिळाल्याने संस्थेच्या वैभवात भर पडली असून जबाबदारी सुद्धा दुपटीने वाढली आहे. ठेवीदार, ग्राहक, खातेदार यांना हा पुरस्कार समर्पित करीत असल्याचे मालतीताई शेळके यांनी सांगितले.