मोताळा तहसील कार्यालयासमोरच पेटवली चूल; गॅस दरवाढ व तुटवड्याविरोधात शिवसेना महिला आघाडी आक्रमक...

 
 मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : राज्यात घरगुती व व्यावसायिक गॅसचा वाढता तुटवडा आणि दरवाढ याविरोधात मोताळा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. आंदोलनाचा भाग म्हणून तहसील कार्यालयासमोरच चूल पेटवून शासनाच्या निष्क्रियतेचा निषेध करण्यात आला. यासंदर्भात तालुकाप्रमुखांनी मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करून तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली. सदर निवेदन तहसीलदार, मोताळा यांच्यामार्फत देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सध्या गुढीपाडवा व रमजानसारख्या सणासुदीच्या काळातही गॅसचा गंभीर तुटवडा निर्माण झाला असून, सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गॅस सिलेंडर बुक केल्यानंतर वेळेवर OTP मिळत नसल्याने तसेच बुकिंग प्रक्रिया सुरळीत नसल्याने नागरिकांना तासन्तास रांगेत उभे राहूनही सिलेंडर मिळत नाही. तसेच अधिकृत प्रक्रियेत गॅस उपलब्ध नसताना अतिरिक्त दोन ते अडीच हजार रुपये दिल्यास सहज सिलेंडर मिळत असल्याच्या तक्रारी समोर येत असून, यामध्ये मोठ्या प्रमाणावर काळाबाजार सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे सामान्य नागरिकांची आर्थिक लूट होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात करण्यात आलेली ६० रुपयांची वाढ तात्काळ मागे घ्यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. याशिवाय व्यावसायिक गॅसचा पुरवठा ठप्प झाल्यामुळे हॉटेल, खानावळ व लघुउद्योजकांवर गंभीर परिणाम झाला असून, हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह धोक्यात आल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले आहे.
शिवसेना महिला आघाडीने सरकारकडे गॅस पुरवठा सुरळीत करणे, बुकिंग प्रक्रियेत पारदर्शकता आणणे, काळाबाजार रोखण्यासाठी कठोर कारवाई करणे, व्यावसायिक गॅसचा पुरवठा तात्काळ पूर्ववत करणे तसेच बाधित व्यावसायिक व विद्यार्थ्यांना आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे. सरकारने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी मोताळा महिला आघाडी तालुकाप्रमुख कल्पना पुरी, तालुकाप्रमुख विजय इंगळे, संगीता कोळसे, प्रियंका क्षीरसागर, सुनंदा अहिरे, विमल अहिरे, दुर्गा सोडे, सविता अहिरे, शालिनी खराटे, राजकन्या गवई, तारा कोळसे, सखु राजपूत, अश्विनी उबाळे, शेवंता सुरडकर, अरुणा महाजन, अर्चना पाटील, शोभा शर्मा, अक्षय जवरे, ज्ञानेश्वर कोळसे, विठ्ठल कोळसे यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.