" चालकाने प्रसंगावधान राखत बस थांबवली... म्हणून जीव वाचले?" बुलढाणा–सैलानी मार्गावरील 'मृत्यूचा खड्डा' पाहून एसटी चालकही हादरला;
जीव मुठीत घेऊन प्रवास, आता अपघात झाल्यावरच प्रशासन जागे होणार का?
या घटनेनंतर बस चालकाने घटनास्थळाचाच व्हिडिओ तयार करत रस्त्याची भयावह अवस्था जगासमोर आणली. "जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे," अशी हतबल प्रतिक्रिया चालकाने व्यक्त केली. प्रवाशांच्या जीवाची जबाबदारी वाहणाऱ्या एसटी चालकावर अशी वेळ येणे, ही सार्वजनिक बांधकाम विभागासाठी लाजिरवाणी बाब असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे, रस्ता दुरुस्त करण्याचे काम प्रशासनाचे असताना बस वाहकाला उपलब्ध साधनांच्या मदतीने खड्डा तात्पुरता बुजविण्याचा प्रयत्न करावा लागला. त्यानंतरच बस सावधपणे पुढे नेण्यात आली. हा प्रकार म्हणजे प्रशासनाच्या निष्क्रियतेचा जिवंत पुरावाच असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
बुलढाणा–सैलानी मार्ग हा हजारो प्रवाशांसाठी, शाळकरी विद्यार्थ्यांसाठी आणि भाविकांसाठी महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र पावसाळा सुरू झाला की या मार्गाची दुरवस्था कायम समोर येते. मोठमोठे खड्डे, उखडलेला रस्ता आणि जीवघेणी परिस्थिती असूनही कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.प्रश्न असा आहे की, मोठा अपघात झाल्यावरच सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येणार आहे का? एखाद्या बसचा तोल जाऊन निष्पाप प्रवाशांचा जीव गेल्यानंतरच अधिकारी घटनास्थळी धाव घेणार आहेत का? आज एका जबाबदार चालकाच्या प्रसंगावधानामुळे शेकडो जीव वाचले; पण प्रत्येक वेळी असेच नशीब साथ देईल, याची खात्री कोण देणार?
दरवर्षी पावसाळ्यात याच रस्त्याचे पितळ उघडे पडते, तरीही कोट्यवधींच्या विकासकामांच्या गप्पा मारणारी यंत्रणा कायम मौन बाळगते. रायपूर–सैलानी मार्गावरील हा 'मृत्यूचा खड्डा' तातडीने बुजवून संपूर्ण रस्त्याची गुणवत्ता तपासावी, दोषींवर कारवाई करावी आणि नागरिकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या निष्काळजीपणाला लगाम घालावा, अशी जोरदार मागणी आता नागरिकांकडून होत आहे.